मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याच्या भूमिकेवरुन जाहीर भाष्य केले. त्यानंतर पार्थ कमालीचा नाराज झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी बहीण खासदार सुप्रिया सुळे गेल्यात. त्यांच्यात काय चर्चा झाली ती पुढे आलेली नाही. पार्थ हे अजित पवार यांचे चिरंजीव. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने पार्थसह अजितदादा नाराज होते. त्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले होते. त्यावेळी अजित पवार यांची समजूत काढत मनधरणी केल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आताही शरद पवार यांनी नातू पार्थ याला शाब्दीक फटकरल्यानंतर कटुतेची भावना वाढीस लागली. यावरुन दोन दिवस बैठका होत आहेत. आता शिवसेनेने पार्थ पवार लहान आहेत. ते राजकारणात नवीन आहेत, असे सांगत शरद पवार वेगळ वागले नाहीत, असे शिवसेने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवार कुटुंबीयांच्या नाराजीबाबत दैनिक 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे. चि. पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करुन कसदार बनायची संधी आहे. शरद पवार यांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.


 पक्षाची धुरा सांभाळणाऱ्यांना अनेकदा ‘कटू’ बोलावे लागते. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा हे कडू घोट स्वकीयांना पाजले आहेत. जाहीरपणे कान उपटले आहेत. महात्मा गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी इतकेच काय, पंतप्रधान मोदी यांनीही वेळोवेळी स्वकीयांना कडू कारल्याची भाजी खायला घातलीच आहे. प्रकृतीला ती बरी असते. ज्येष्ठांनी असेच वागायचे असते. शरद पवार वेगळे वागले नाहीत, सामना संपादीकयमध्ये म्हटले आहे.


सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव असल्याचंही शिवसेनेने म्हटले आहे.


शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरून वादळ उठले आहे. म्हटले तर वादळ, म्हटले तर काहीच नाही. हे चहाच्या पेल्यातील वादळही नाही, पण चर्चांचे रवंथ वृत्तवाहिन्यांवर सुरु आहे.  ‘सबसे तेज’ स्पर्धेतील वृत्तवाहिन्यांना मिरची मसाला हवा असतो. त्यामुळे हे लोक त्यांच्या उदरभरणासाठी अशी कृत्रिम वादवादळे निर्माण करीत असतात. आता निमित्त पार्थ यांचे आहे. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे अधूनमधून पत्राद्वारे किंवा सोशल मीडियावर वगैरे आपली मते मांडत असतात. ती अनेकदा दखलपात्र असतातच असे नाही. अजित पवार यांचे पुत्र काहीतरी मत व्यक्त करतात एवढ्यापुरतेच त्याचे महत्त्व, असे शिवसेनेने म्हटले आहे.


सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, असे एक पत्र त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. शिवाय काही सिनेनिर्मात्यांचीही चौकशी करावी असेही त्यांनी समाज माध्यमांवर सांगितले. आताच त्यांनी अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजन सोहळयास शुभेच्छा देणारे पत्र पाठवून रामनामाचा जप केला. यावर निर्माण झालेले वादळ शांत झाल्यावर शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, माझ्या नातवाकडे लक्ष देऊ नका, हे सगळे बालीश आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, अशी पवारांची भूमिका होती. मात्र, याचा मोठा गाजावजा करण्यात आला आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.  


शरद पवार हे आयुष्यभर माणसांत राहिले, जमिनीवरचे राजकारण त्यांनी केले. अजित पवार, सुप्रिया सुळेही तेच करीत आहेत. पवारांच्या तिसऱया पिढीने तोच मार्ग स्वीकारला तर वादळे निर्माण होणार नाहीत, असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.