भाजप उमेदवाराचे शहीद करकरेंबाबत संतापजनक वक्तव्य, उद्धव ठाकरेंचा बोलण्यास नकार
शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्ताच बोलण्यास नकार दिला आहे.
मुंबई : मालेगाव स्फोट खटल्यातली प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह हिला भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्ताच बोलण्यास नकार दिला आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे प्रज्ञासिंह ठाकूरने धक्कादायक वक्तव्य केले आहे. दहशतवाद्यांनी करकरे यांना मारल्यानंतरच माझे सुतक सुटले, असे प्रज्ञासिंग हिने म्हटले. करकरे मला दहशतवादी घोषित करण्यासाठी इरेला पेटले होते. पुरावे आणण्यासाठी आता मी देवाकडे जाऊ का, असा प्रश्न त्यांनी मला विचारल्यावर मी म्हटले हवे तर देवाकडे जा. त्यानंतर लगेच त्यांची हत्या झाली असा दावा प्रज्ञासिंह ठाकूरने केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिल्याच्या तीव्र प्रतिक्रिया मालेगावात उमटत आहेत. बॉम्बस्फोटासारखा गंभीर आरोप असताना आणि न्यायालयात खटला सुरू असताना भाजपने तिला उमेदवारी दिलीच कशी, असा सवाल बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला मृतांच्या नातेवाईकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.