मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील कथित आरोपी संभाजी भिडे यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट देऊन टाकलीय. संभाजी भिडे गुरुजींचा भीमा कोरेगाव घटनेत सहभाग नाही... घटना घडली त्याच्या सहा महिने आधीही भीमा-कोरेगाव भागात भिडे गुरुजींचा संचार नाही, असं विधान मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलंय. 


काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेला कुणीही जबाबदार असले... अगदी ते माझे नातेवाईक असले तरीही त्यांना सोडलं जाणार नाही... प्रत्यक्ष संबंध सोडा दुरान्वयेही संबंध आढळला तरी कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 


प्रकाश आंबेडकर यांना काल ही परिस्थिती समजावून सांगितली आहे. आंबेडकर यांनी कालच्या बैठकीत फेसबुक पोस्टचे पुरावे दिले आहेत. आंबेडकरांनी दिलेल्या पुराव्यावरून आठ दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन त्यांना दिलंय, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 


भिडेंसाठी दोन गट भिडणार? 


दरम्यान, सोमवारी प्रकाश आंबेडकारांनी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाचे पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बघायला मिळाले. विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोरेगाव-भीमाच्या दंगलीनंतर सरकराच्या कारवाईवर टीकास्त्र सोडलं. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला कारवाईचे निर्देश देण्याची अध्यक्षांना विनंती केली.


शिवप्रतिष्ठानच्या वतीनं संभाजी भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा काढला जाणार आहे. सांगलीत पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आलीय. २८ मार्चला राज्यात जिल्हा स्तरावर हे भव्य मोर्चे काढले जाणार आहेत. फक्त राज्यातच नाही तर बेळगाव आणि गोव्यातही मोर्चे काढले जाणार आहेत. या मोर्च्याला विविध पक्ष आणि दलितांच्या २४ संघटनाचा पाठिंबा आहे. प्रकाश आंबेडकरांवर कारवाईची मागणी करण्यात आलीय. अन्यथा सरकार विरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आलाय. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी ही माहिती दिलीय. शिवाय भिडे गुरुजींवरचे गुन्हे मागे घ्या, पुण्यातल्या एल्गार परिषदेतल्या वक्तव्यांवर गुन्हे दाखल करा. तीन जानेवारीला झालेल्या नुकसानीची भरपाई, बंद पुकारणाऱ्यांकडून वसूल करावी, या आणि आणखीही काही मागण्यांसाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे.


कोण आहेत संभाजी भिडे?


मनोहर भिडे हे त्यांचं मूळ नाव, पण संभाजी भिडे गुरूजी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वय वर्षं 80 आहे. या वयातही ते दररोज १५० जोर, १५० बैठका आणि १५० सूर्यनमस्कार घालतात. पायात चपला न घालता अनवाणीच फिरतात. प्रवास करायचा झाला तर सायकल किंवा एसटीनंच. साता-यातलं सबनीसवाडी हे त्यांचं मूळ गाव. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम.ए. केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. पूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नावाची संघटना उभी केली. या संघटनेत विविध जातीधर्माच्या तरूणांचा समावेश असून, त्यातल्या प्रत्येकाला धारकरी म्हणतात...


गडकोट मोहीम आणि दुर्गामाता दौड असे दोन प्रमुख कार्यक्रम ही संघटना राबवते. नवरात्रौत्सवाच्या काळात नऊ दिवस चालणा-या या दौडीची सांगता दस-याला होते. दररोज रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, राज्याभिषेक दिन, धर्मवीर बलिदान मास, जनजागरण, इतिहास अभ्यास परिषद असे धार्मिक आणि प्रबोधनपर कार्यक्रम संघटनेमार्फत राबवले जातात. आतापर्यंत एक लाख शिवचरित्र घराघरात पोहोचवण्याचे श्रेय भिडे गुरूजींनाच दिलं जातं.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चांगलीच जवळीक आहेत. एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी देखील त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. सर्वच पक्षातील नेते भिडे गुरुजींना गुरुस्थानी मानतात. १ मे २०१६ रोजी सांगलीत शिवसेना आणि शिवप्रतिष्ठान यांचा संयुक्त मेळावा झाला होता. त्यावेळी भिडे गुरूजींनी शिवसेनेचं कौतुक करताना, भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली होती.


कोरेगाव भिमामध्ये उसळलेली दंगल त्यांच्याच चिथावणीमुळं भडकली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर यामागं राजकीय षडयंत्र असून, त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी भिडे गुरूजींनी केलीय. सत्ताधारी राजकीय पक्षात भिडे गुरूजींचा आदर करणारे नेते असल्यानं त्यांना लक्ष्य केलं जातंय का? शिवसेनेशी असलेली जवळीक त्यांना नडलीय का? आणि भिडे गुरूजींना लक्ष्य करण्यामागं कुणाचा हात आहे? असे सवाल आता उपस्थित होतायत... यानिमित्तानं भिडे गुरूजी प्रकाशझोतात आले आहेत.