मुंबई :  संभाजीराजे (Sambhaji Raje) विरुद्ध शिवसेना (Shiv Sena) वाद चांगलाच पेटलाय. राज्यसभा उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राजेंनी केलाय. खरंच मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला का? त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा नवा सामना कसा रंगलाय, पाहूयात हा रिपोर्ट. (sambhaji raje critisized to cm uddhav thackeray over to rajya sabha candidature)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी आपण माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.  मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले.  शिवसेनेसोबत नेमक्या काय वाटाघाटी झाल्या, याचा तपशीलच राजेंनी जाहीर केला.


मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडला? 


अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी संभाजीराजेंनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. मात्र शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव राजेंनी दिला.सगळं काही ठरलं. ड्राफ्ट फायनल झाला.


संभाजीराजे कोल्हापूरला निघाले, तेव्हाच संजय पवारांना उमेदवारी दिल्याचं कळलं, असं राजेंनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडला, असा आरोपही त्यांनी केला. संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यात सुरू झालेल्या या वादात आता भाजपनंही उडी घेतलीय.


संभाजीराजे छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतो, हे उघड झाले. आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं होतं म्हणून अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले, असा टीकेचा भडीमार करणारं ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केलंय.


भाजपवर विश्वासघाताचा आरोप करणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता उद्धव ठाकरेंनीच शब्द फिरवल्याचा आरोप संभाजीराजेंनी केलाय. राजकारणात चार भिंतीच्या आत नेमकं काय ठरतं आणि प्रत्यक्षात काय घडतं, याचा तर्क लावणं दिवसागणिक अवघड होत चाललंय.