मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. आर्यन खान अटकेच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर विविध गंभीर आरोप केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्ज प्रकरणी जी कारवाई करण्यात येत आहे ती ठरवून केली जात आहे. NCB ठरवून खोट्या केसेस करत आहे असा आरोप करून मलिक यांनी वानखेडे यांच्या विरोधातील पुरावे वेळोवेळी उघड केले होते. मलिक आणि वानखेडे यांच्या संघर्षाचे परिणाम वानखेडे यांच्या बदलीच्या रूपात पाहायला मिळाले.


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर पदावरून वानखेडे यांची डायरेक्टरेट रेव्हेन्यू इंटेलिजन्स ( डीआरआय ) विभागात बदली करण्यात आली आहे. याआधी सुद्धा डीआरआय विभागात समीर वानखेडे यांनी काम केले आहे. 


वानखेडे यांचा एनसीबी झोनल डायरेक्टर पदाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपला. मात्र, त्यांनी मुदतवाढ मागितली नाही. त्यामुळे त्यांची डायरेक्टरेट रेव्हेन्यू इंटेलिजन्स या विभागात बदली करण्यात आली. 


समीर वानखेडे यांनी त्याच्या NCB झोनल डायरेक्टर पदाच्या कारकीर्दीत 96 लोकांना अटक केली. तर, ऑगस्ट-डिसेंबर 2020 या काळात 28 गुन्हे दाखल केले. सुशांत सिंह राजपूत ड्रग केस, आर्यन खान ड्रग्स क्रुझ सारखी हाय प्रोफाइल प्रकरणाचा तपास त्यांनी केला. तर, 117 प्रकरणांमध्ये सुमारे 1000 कोटी रुपयांचे 1791 किलो ड्रग्ज त्यांनी जप्त केले होते.