मुंबई :  NCB अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti redkar) समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे आणि समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज राजभवनावर राज्यपाल भगतसिह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे समीर वानखेडे चर्चेत आहेत.  या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपांची ही मालिका अजूनही संपायचं नाव घेत नाहीए. या पार्श्वभूमीवर क्रांती रेडकर, यास्मिन वानखेडे आणि ज्ञानदेव वानखेडे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. 
 
या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही राज्यपालांना निवेदन दिल्याची माहिती क्रांती रेडकर यांनी दिली तसंच आम्हाला न्याय मिळेल, ज्यांना वाटत असेल की हे गरीब बिचारे इथून तिते फिरत आहेत, पण तसं नाहीए,  आम्ही योद्धा आहोत, आम्ही सत्यासाठी लढणार आहोत, विजय आमचाच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 


राज्यपालांनी आम्हाला धैर्य ठेवण्यास सांगितलं आहे, आम्हाला त्यांचा पाठिंबा आहे, आमचा विजय नक्की होईल असं ते म्हणाल्याचं क्रांती रेडकर यांनी सांगितलं. खोटे पुरावे दाखवून इज्जत आणि अब्रूवर हल्ले होत आहेत, हे सगळं आम्ही राज्यपालांच्या कानावर घातलं आहे, आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, असं क्रांती रेडकर यांनी माध्यमांना सांगितलं.


समीर वानखेडे यांच्यावर आरोपानंतर त्यांच्याकडून आर्यन खानसह काही प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. मात्र ते NCB चे मुंबई झोनल डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत.