मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना अटक होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS) प्रवक्ते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS) प्रवक्ते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांवर गुन्हा दाखल झाल्यापासून ते गायब आहेत. अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. 19 मे रोजी कोर्ट अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देणार आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या गुन्हा का दाखल?
धार्मिकस्थळांवरील भोंगे हटवा या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनादरम्यान मशिदीसमोर भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसे कार्याकर्त्यांना दिले होते. म्हणून पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून राज्यभर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. अशीच कारवाई पोलीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर करत असताना या दोघांनी गाडीत बसून पळ काढला. दरम्यान या धावपळीत एक महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडून जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल केला. तेव्हा पासून हे दोन्ही नेते गायब आहेत. पोलिसांनी या दोघांच्या अटकेसाठी पथकं देखील तयार केली . मात्र देशपांडे आणि धुरी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
अटक टाळण्यासाठी धावाधाव
संतोष धुरी आणि संदीप देशपांडे अटक टाळण्यासाठी धावाधाव करत आहेत . त्यांनी अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्याची सुनावणी आज कोर्टात झाली. कोर्टाने या दोघांच्या अर्जावरील निकाल राखून ठेवला आहे. 19 मे रोजी कोर्ट आपला निर्णय देईल.