मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर, प्रवासी कामगार गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत अडकले आहेत. आता मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी श्रमिक ट्रेनची सोय करण्यात येत आहे. मात्र, श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून सध्या ट्विटरवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या भांडणात जनतेची स्थिती म्हणजे 'आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना' अशी झाली असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रात पुरेशा ट्रेन सोडत नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून आम्ही उद्याच्या उद्या महाराष्ट्रासाठी १२५ ट्रेन सोडायला तयार असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी राज्य सरकारने मजुरांची यादी आणि संबंधित तपशील रेल्वे विभागाला द्यावा, असं म्हटलं होतं. हे ट्विट केल्यानंतर साधारण दीड तासांनी पियुष गोयल यांनी आणखी एक ट्विट करुन राज्य सरकारने मजुरांची यादी पाठवलीच नसल्याचं सांगितलं. 


गोयल यांच्या ट्विटनंतर आम्ही एका तासाच्या आतच मजुरांची यादी रेल्वेला पाठवली असल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला होता. परंतु, मध्यरात्रीनंतर पियूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करत महाराष्ट्र सरकारने रेल्वेला अजूनही यादी दिलीच नसल्याचं सांगितलं. त्यामुळे ट्विटरच्या या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रात स्थलांतरित मजुरांची यादी रेल्वेपर्यंत पोहोचली की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारात मात्र गोर-गरीब मजूराची फरफटच होताना दिसतेय.