मुंबई : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. राहुल गांधींच्या मुंबईतील सभेत संयज निरुपम अनुपस्थित होते. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, यावर पडदा टाकण्यासाठी निरुपमांना सोशल मीडियाचा आधार घ्याव लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींच्या सभेला मी अनुपस्थित राहिलो, याबाबत सुरु असलेल्या चर्चांना काहीही अर्थ नाही. कौटुंबिक कार्यक्रमामुळे मी दिवसभर व्यस्त होतो. याबाबत राहुल गांधींना मी आधीच माहिती दिली होती. पण या सभेत निकम्मा का उपस्थित नव्हता? असा सवालही निरुपम यांनी विचारला आहे. निरुपम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा निशाणा मिलिंद देवरा यांच्यावर असल्याचं बोललं जात आहे.



काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारासाठी पहिल्यांच महाराष्ट्रात आले होते. लातूर जिल्ह्यातील औसामध्ये पहिली सभा घेतल्यानंतर त्यांच्या दोन सभा मुंबईत झाल्या. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि दुसरे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी राहुल गांधीच्या सभेला दांडी मारली.


गेल्या काही दिवसातील पक्षातील घडामोडींमुळे दोन्ही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. संजय निरुपम यांनी तर काही दिवसांपूर्वी आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलं होतं.


मिलिंद देवरा यांच्या गैरहजेरीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून देवरा हे नाराज असल्याची चर्चा आहे. ३७० चा मुद्दा आणि त्यानंतर काही बाबतीत देवरा यांनी ट्विट करुन नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं होतं. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचीही चर्चा आहे. राहुल गांधीच्या सभेमुळे पक्षाच्या प्रचारापेक्षा पक्षातील धुसफूसची समोर आली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवरा यांनी लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.