संजय राऊत यांना `ते` आरोप भोवणार? आरोग्यमंत्री अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार
Maharashtra Politics : आरोग्य खात्यावर बिनबुडाचे आरोप केल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय. पत्रकार परिषद घेत तानाजी सावंत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Maharashtra Politics : संजय राऊतांनी (Sanjay Raut) माफी मागावी अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असा इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी दिलाय. बदली आणि भरत्यांमध्ये पारदर्शी कारभार असून राऊतांच्या आरोपात तथ्य नाही असं सावंतांनी म्हंटलंय. राज्यात आरोग्य अधिकाऱ्यांना बॉसला खंडणी द्यावे लागते असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला होता. त्याला तानाजी सावंतांनी प्रत्युत्तर दिलंय.
तानाजी सावंत यांनी काय म्हटलंय
"राज्यातील आरोग्य खात्यातील बदल्यांसाठी पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. आपण आरोग्य मंत्री पदाचा कारभार स्विकारल्यानंतर फेसलेस या पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. या पारदर्शक कारभारामुळेच आता राज्यातील आरोग्य खात्यातील (Health Department) सर्व बदल्या या फक्त योग्य निकशावरच होत आहेत. शिवाय या नव्या पारदर्शक प्रणालीमुळे आरोग्य खात्यातील बदल्यांचे अधिकार माझ्याकडे नाहीतच , असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. आरोग्य विभागामध्ये संचालकांची पदं भरली नाहीत, बदल्यांच्या बाबतीत गैरव्यवहार झाला असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या आरोपानंतर तानाजी सावंत यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
आरोग्य विभागामध्ये बदल्यांसाठी आणि नियुक्ती मिळवण्यासाठी मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरु असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या सगळ्या आरोपांना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर दिलं आहे . नागपूरच्या रविभवन इथं आयोजित पत्रकार परिषदेमधून त्यांनी आरोप खोडून काढले. 2012 पासून आतापर्यंत आरोग्य विभागाची बिंदुनामावलीच तयार नाहीये. संजय राऊत हे ते तीन ते चार टर्म खासदार आहेत आणि पत्रकारही आहेत. त्यांनी बिंदुनामावलीचं महत्व ओळखलं पाहिजे. समाजकल्याण विभागाने त्याबाबत मागणी केली होती, त्याशिवाय सध्याची भरती झाली नसती. पण आपण विनंती केली आणि तीन महिन्यांच्या अटींवर भरती प्रक्रिया सुरु केली' असं सांगत तानाजी सावंत यांनी राऊतांचे इतरही आरोप खोडून काढले.
आरोग्य विभागामध्ये संचालकांची पदं भरली नाहीत, बदल्यांच्या बाबतीत गैरव्यवहार झाला असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. 11 मे 2023 रोजी बदल्यांचे सर्व अधिकार आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. शासन निर्णय 17 मे 2023 नुसार ऑनलाईन बदल्या किंवा विनंती बदल्यांचे अधिकार मी प्रशासनाला दिलेले आहेत. भरती प्रक्रिया किंवा बदली प्रक्रिया पारदर्शकपणे सुरु आहेत.. सीएसआर फंडातून अॅपची निर्मिती झाली आणि बदली पारदर्शकपणे होऊन गट अ ते गट क यांच्या 7 ते 8 हजार बदल्या झाल्याचं सावंतांनी सांगितलं.
मागच्या सरकारमध्ये भरती प्रक्रियेत कसा गोंधळ झाला, हे सर्वांनाच माहिती आहे. यावेळची भरती मात्र अत्यंत पारदर्शकपणे सुरु आहे. दररोज आरोग्य खात्याच्या भरती संदर्भातील परिक्षेचे पेपर संपल्यानंतर याबद्दल माहिती घेत असतो असेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले.
ज्या दिवसापासून आरोग्य खात्याचा कारभार मी सांभाळलेला आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेचं आरोग्य कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे?, आरोग्य विभागात कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत? आरोग्य विभागाने आतापर्यंत घेतलेले वेगवेगळे निर्णय कोणते? आणि ज्या अपेक्षेने महाराष्ट्रातील जनता आरोग्य विभागाकडे बघते आहे, तो विश्वास कुठंतरी तुटता कामा नये, एका व्यक्तीसाठी एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठो तो किरकोळ भाग आहे, त्यांनाही माहीत आहे. कुठलातरी एक दगड घ्यायचा तो मारायचा आणि नंतर बघत बसायचं.'' असेही तानाजी सावंत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपामुळे कोरोनात देवदुताप्रमाणे अहोरात्र झटलेल्या आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांचा अपमान झाला आहे. तसेच माझ्या कार्यालयातील कर्मचार्यांवर केलेल्या आरोपांमुळे माझ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची झाले आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी आरोग्य खात्यातील माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांची माफी मागावी असेही तानजी सावंत म्हणाले.