यापुढे शिवसेनेच्या वाटचालीत `महा`च होणार....
संजय राऊतांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
मुंबई : 'सर्वकाही सुरळीत असतं तर आजचा दसरा मेळावा जगानं नोंद घ्यावी असा मोठा झाला असता', असं संजय राऊत दसरा मेळाव्यात म्हणाले. शिवसेनेचा 'दसरा मेळावा' सुरू झाला आहे. मेळाव्याची सुरुवात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून केली.
'वाईटावर चांगल्याचा विजय, याच दिवशी मागील वर्षी युद्धाला प्रारंभ झाला. यापुढं सेनेच्या वाटचालीत 'महा' होणार...जसं महाविकास आघाडी तसेच हेच 'महा' घेवून दिल्लीचे तख्त राखायला जाईल.
टमागील वर्षीच्या दसरा मेळाव्यात केलेले विधान सहज सांगितलेले नव्हते,ते संकेत असतात. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असं म्हटलं होतं. पक्षप्रमुखाच्या शेजारी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसेल असं म्हटलं होतं. पण पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाले याचा आनंद झाला. तुम्ही मुख्यमंत्री म्हणजे ११ कोटी जनता मुख्यमंत्री झालीय, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
वीर सावरकर आणि शिवतीर्थाचे एक नाते आहे. हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे एक नाते आहे. वीर सावरकरांनी हिंदुत्व शिकवलं त्याच मार्गावर शिवसेना उद्धव ठाकरे पुढं नेतायत. प्रत्येक संकटाशी लढा देताना मुख्यमंत्री डगमगले नाहीत. आरोप,टीका झाली तरी राज्याचा गाडा मुख्यमंत्री पुढं नेतायत, याची नोंद इतिहासात होईल.
कुणी किती प्रयत्न, कारस्थानं, चिखलफेक केली तरी हे सरकार ५ वर्षे राहणार. तसंच पुढील २५ वर्षांचा करारही केलाय. तारखा कितीही द्या, पैशाचा खेळ कितीही खेळा पण या सरकारच्या पाठिशी जनता आहे, असं यावेळी संजय राऊत म्हणाले