मुंबई: धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा RSS महत्त्वाचा वाटा आहे. हे श्रेय एकट्या राज्य सरकारचे नाही, असा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला होता. यानंतर धारावी मॉडेलवरून श्रेयवादाचे राजकारण रंगले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फक्त धारावीचे श्रेय का देता? मग संघाने नागपूर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही जाऊन काम करावे, असे राऊत यांनी म्हटले. धारावीच्या श्रेयावरुन राजकारण करणे योग्य नाही. पालिकेने तेथे प्रचंड काम केले आहे. यादरम्यान पालिकेचे कर्मचारीही मरण पावलेत, मग त्यांचं काय? श्रेय कधी आणि कुठे घ्यायचं याचं भान असायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी भाजपला सुनावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावीच्या श्रेयवादाचा मुद्दा तापला; राष्ट्रवादीची चंद्रकांत पाटलांवर शेलक्या भाषेत टीका


जागतिक आरोग्य संघटनेने WHO धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचे कौतुक केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचे श्रेय एकट्या राज्य सराकारचे नाही. त्याठिकाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून पाटील यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. 

तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही धारावीच्या मुद्द्यावरुन भाजपवर हल्ला चढवला होता. धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती असल्याचे शेवाळे यांनी म्हटले. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका असल्याचे शेवाळे यांनी म्हटले होते.