मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबी चौकशीवरून खासदार संजय राऊत यांनी चांगलाच टोला लगावला आहे. बिहारमध्ये निवडणुका विकास, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर लढल्या जाव्या, पण हे सगळे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून मुद्दे पार्सल होऊ शकतात, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड कलाकारांच्या एनसीबी चौकशीवरून खासदार संजय राऊत यांनी चांगलाच टोला दिलाय. हत्या आणि आत्महत्यांवरून तपास सुरू झाला. आता हा तपास कुठपर्यंत गेलाय पाहा. सगळ्यांचाच वेळ जातोय. ठिक आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी बिहारमधला कोविड-१९ संपूर्णपणे संपल्याशिवाय निवडणुका कशा लढल्या जाणार आहेत, असा सवाल राऊत यांनी विचारला.


बिहार निवडणुकांसाठी सरकारने नेमकी काय उपाययोजना केली, असा सवाल त्यांनी विचारला आहे. बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे राजकारण होत आहे. सरकारने कोरोना नावाचे प्रकरण संपवून टाकले आहे. एक मंत्री, ३ खासदारांचे निधन झाल्याने संसद अधिवेशन गुंडाळल्याचे राऊत म्हणाले.  


सुशांतसिंह राजपूत हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असावा, यासाठीच मुंबईत इतके राजकारण केले. कामाचे,विकासाचे मुद्दे नसल्याने मुंबईतले मुद्दे प्रचारात आणले जात आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.


दरम्यान, सीबीआयकडून सुशातसिंह मृत्यू चौकशी प्रकरणी सुशांतच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सीबीआयच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सुशांतच्या वडिलांना काल सीबीआय चौकशीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.