काँग्रेस नेत्यांनी सुनावल्यावर इंदिरा गांधींबाबत संजय राऊतांची सारवासारव
अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटी व्हायच्या
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटी व्हायच्या, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी काल केलं होतं. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे.
एकेकाळचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला हा पठाणांच्या संघटनेचा अध्यक्ष होता. त्या निमित्तानं तो इंदिरा गांधींना पंतप्रधान या नात्यानं भेटत असे, असं सांगत संजय राऊंतांनी कालच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. तर काँग्रेस नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का? असा सवाल उपस्थित करत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. सत्तेसाठी लालची असल्यामुळेच काँग्रेस या आरोपाचं खंडन करत नसल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलीयं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींबाबत केलेले वक्तव्य त्वरित मागे घ्यावेत असं मिलिंद देवरा म्हणालेत. तर संजय निरुपम यांनीही राऊतांवर टीकास्त्र सोडंलय. इंदिरा गांधींविरोधात अविचारी बोलाल तर पश्चाताप कराल अशा शब्दांत निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलंय.
शिवसेनेचे मिस्टर शायर असणाऱ्यांनी हलक्या फुलक्या शायरी करुन महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यातच हित आहे. इंदिरा गांधींबाबत दुष्प्रचार कराल तर पस्तावाल. काल त्यांनी जे विधान केलं ते मागे घ्यावं, असं संजय निरुपम म्हणाले आहेत.
तर मिलिंद देवरा यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत कधीच तडजोड केली नाही. संजय राऊत यांनी चुकीची माहिती असलेलं त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी मी मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष या नात्याने करतो. दिवंगत पंतप्रधानांबाबत अशी वक्तव्य करताना संयम बाळगला पाहिजे, असं मिलिंद देवरा म्हणाले.