मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षाला खऱ्या अर्थाने विराम मिळाला. त्यामुळेच या लढाईत शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या संजय राऊत यांनीही आपली तलवार म्यान केली. संजय राऊत यांनी गुरुवारी ट्विट करुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सद्भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहोळ्याला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. तसेच आपले हे नाते असेच राहू दे, अशी सदिच्छाही राऊत यांनी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो आमचा, फोटोग्राफर आमचा... आशिष शेलारांना काँग्रेसचे सणसणीत प्रत्युत्तर


शिवाजी पार्कवर हजारोंच्या जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केली. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. मात्र, शपथविधी सोहळ्यानंतर या दोघांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच काढता पाय घेतला होता.


उद्धव ठाकरेंचा 'सामना'च्या संपादकपदाचा राजीनामा



शिवसेना आणि भाजप यांनी युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. याची परिणती युती तुटण्यात झाली होती. या संपूर्ण काळात संजय राऊत यांनी एकट्याने भाजपला अंगावर घेतले होते. भाजपच्या प्रत्येक टीकेला राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. दररोज ट्विट आणि पत्रकारपरिषदा घेऊन त्यांनी वारंवार मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे ठासून सांगितले होते. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसशी वाटाघाटी करण्याचे कामही राऊत यांनी पार पाडले होते. यावरून भाजपच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीकाही केली होती. मात्र, संजय राऊत यांनी भाजपचा प्रत्येक वार परतावून लावला होता.