Sanjay Raut On Kharghar Accident : खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  हा मृत्यूचा आकडा सरकार लपवत आहे, असा गंभीर आरोप राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. पाण्याविना सरकारने 50 हून अधिक लोकांचे जीव घेतले असून, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. खोके सरकारमधील लोक मृतांच्या नातेवाईकांना पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करत आहेत, असाही आरोप राऊत यांनी केला आहे. तसेच पालघरमधील साधूंच्या हत्येवेळी तांडव करणारे भाजप नेते आता कुठे आहेत ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माणुसकी मेलीय का...? मुख्यमंत्री दुर्घटनेबाबत गप्प का .? असे सवाल करत राऊतांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची जलसंघर्ष यात्रा रोखली आहे. देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता महाराष्ट्र मोगलाई अवतरली आहे, अशी टीका राऊत यांनी यावेळी सरकारवर केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील खारघर इथे 16 एप्रिल 2023 ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागले. कार्यक्रमस्थळी काही लोकांचा मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास 20 लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता.


महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील 14 सदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू उष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. आता संजय राऊत यांनीही गंभीर आरोप केला आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी विधीमंडळाचं दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे अशी मागणी नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून केली आहे.



 


महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते. त्यामुळे 14 मृत्यूंची जबाबदारी आयोजक या नात्याने त्यांना नाकारता येणार नाही. या घटनेप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावी अशी मागणी आम्ही आधीच केलेली आहे. या सरकारला जनाची नाही तर मनाची असती तर आतापर्यंत राजीनामे दिले असते पण ते खुर्चीला चिकटून बसले आहेत. शिंदे सरकार खारघर घटनेतील सत्य लपवत आहे. परंतु काँग्रेस पक्ष या घटनेतील सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी दिनांक 24 एप्रिल रोजी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगणार आहे, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं आहे.