मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांच्यासोबत रामदास कदम हे देखील उपस्थित होते. यावेळी राज्यपालांना संजय राऊत यांनी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांची पुस्तके भेट दिली. ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. मात्र, सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय भेट असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरात लवकर सरकार स्थापन करावं, शिवसेना अडथळा ठरणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावतीने राज्यपालांची आपण सदिच्छा भेट घेतली. तसेच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच अनुभवी आणि चांगले राज्यपाल महाराष्ट्राला मिळाले असल्याची प्रतिक्रिया देखील संजय राऊत यांनी दिली आहे.


विधानसभा निवडणुकीच्या १२ दिवसानंतरही राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे रोज सामनामधून आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला करत आहेत.


आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपानं सगळी मंत्रिपदं घ्या, पण मुख्यमंत्रीपद शिवसेनेचंच आहे, अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी 'झी २४ तास'शी बोलताना मांडली आहे