मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपविरुद्धच्या सत्तासंघर्षात संजय राऊत यांनी अक्षरश: एकहाती शिवसेनेचा किल्ला लढवला आहे. पत्रकारपरिषदा आणि इतर पक्षांशी सत्तेसाठी वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी प्रचंड धावपळ केली होती. यामुळे आज सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वातावरण फिरलं, शिवसेनेच्या गोटात चिडीचूप शांतता


अखेर त्यांना दुपारच्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. यावेळी त्यांच्या हद्याला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


शिवसेनेला मोठा धक्का; सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्यास राज्यपालांचा नकार


विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या सत्तासंघर्षात संजय राऊत यांनी प्रत्येक दिवशी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडली होती. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना माघार घेणार नाही, असे त्यांनी वारंवार ठणकावून सांगितले होते. मात्र, संजय राऊतच रुग्णालयात दाखल झाल्याने शिवसैनिकांची चिंता वाढली होती. 


दरम्यान, राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी अधिक अवधी देण्यास नकार दिल्यामुळे शिवसेनेच्या गोटात चिडीचूप शांतता पसरली आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल झाल्यावर राज्यभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली होती. परंतु, काहीवेळातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रे राजभवनापर्यंत पोहोचलीच नसल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांचे चेहर खर्रकन उतरले. अवघ्या तासाभरापूर्वी जल्लोष करणाऱ्या शिवसेनेच्या गोटात सध्या चिडीचूप शांतता पसरली आहे.