शिवसेनेला मोठा धक्का; सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्यास राज्यपालांचा नकार

राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता आणखीनच वाढला आहे. 

Updated: Nov 11, 2019, 08:07 PM IST
शिवसेनेला मोठा धक्का; सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्यास राज्यपालांचा नकार

मुंबई: राज्यातील सत्तासिंहासनाच्या अगदी जवळ येऊन पोहोचल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी सोमवारी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता आणखीनच वाढला आहे. तसेच राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल झाल्यानंतर राज्यात शिवमहाआघाडीचे सरकार येणार, अशी जोरदार चर्चा होती. काँग्रेस शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणार तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होणार, असेही सांगितले जात होते. त्यामुळे राज्यभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जल्लोषाला सुरुवात केली होती. मात्र, काहीवेळातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रे राजभवनापर्यंत पोहोचलीच नसल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांचे चेहर खर्रकन उतरले होते. यानंतर आदित्य ठाकरे यांनी राजभवनाबाहेर येत पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, राज्यपालांकडून काल संध्याकाळी आम्हाला सत्तास्थापनेसंदर्भात विचारणा करण्यात आली. आमच्याकडे अवघ्या २४ तासांचा अवधी असूनही आम्ही वेगाने हालचाली करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरु केली. या दोन्ही पक्षांनी आम्हाला तत्वत: पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्हाला आणखी दोन दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली. मात्र, ही मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

परंतु, राज्यपालांनी आम्हाला अधिकचा अवधी नाकारला आहे, सत्तास्थापनेची संधी नव्हे, असे सांगत आदित्य यांनी शिवसेनेला अजूनही सत्तास्थापनेची संधी असल्याचा दावा केला आहे.