१४४-१४४ जागा लढलो असतो तर चित्र वेगळं असतं- संजय राऊत
संजय राऊत यांची रोखठोक प्रतिक्रिया
मुंबई : संजय राऊत यांनी झी२४तासला रोखठोक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी रोखठोकपणे शिवसेनेची बाजू मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत भाजप दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
'उद्धव ठाकरेंनी आमदारांसमोर केलेलं भाषण ऐतिहासिक होतं. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली. सत्ता मिळवण्याच्या दृष्टीनेच निवडणुका लढवत होतो. विरोधी पक्षात बसण्यासाठी नाही. पण विरोधी पक्षातही आम्ही योग्य प्रकारे भूमिका बजावली.'
'भाजपने पक्षामध्ये आयारामांची भरमसाठ भरती केली गेली. त्यामुळे त्यांची अडचण झाली. उद्धव ठाकरे यांनी ती अडचण समजून घेतली. राजकारणात असं कोणी करत नाही. तरी देखील उद्धव ठाकरेंनी ती गोष्ट समजून घेतली.'
'दिलेला शब्द पाळायचा नसेल तर रामाचं नाव घेऊ नका. राम मंदिराचं काय ते शिवसेना बघेल. १२ दिवस झाले तरी दिल्लीच्या एकाही प्रमुख नेत्याने महाराष्ट्राच्या या गुंत्यामध्ये लक्ष घातलेलं नाही. दुसऱ्या दिवशीच लक्ष घालायला पाहिजे होते. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र १२ दिवस तुम्ही रखडवत ठेवला आहे.'
'मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची हिम्मत का नाही. सर्वात जास्त जागा जिंकल्या आहे तर करा सत्तास्थापन, कोणाची वाट बघत आहात.' असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
'संयुक्त पत्रकार व्हायला पाहिजे होती. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने झाली असती तर दिवाळीचा आनंद आणखी द्विगुणीत झाला असता.'