दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी 'झी २४ तास'ला स्फोटक मुलाखत दिली आहे. संजय राऊत या मुलाखतीत म्हणाले, '24 तारखेला हरियाणा आणि महाराष्ट्र राज्यातील निकाल लागले, हरियाणात बहुमत नव्हते तरी ते सत्तेवर आले, राज्यात युती होती, युतीला स्पष्ट बहुमत आहे, तरी काय चाललंय हे मला समजत नाही'. तसेच 'सरकार स्थापनेसाठी महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे, युती म्हणून सरकार स्थापन करावे, अशी आमची इच्छा आहे, मात्र त्या दृष्टीने पावले पडताना मला दिसत नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेबांचा दाखल देत संजय राऊत पुढे म्हणाले, 'मित्रांच्या बरोबर इमानदारीने राहायचं, गडबड करायची नाही हे धोरण बाळासाहेबांनी घालून दिलंय ते आम्ही पाळतोय'.


'लोकसभा निवडणुकीआधी एकत्र पत्रकार परिषदेत पदांचे आणि सत्तेचे वाटप हे समसमान होईल अशी भूमिका अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली होती, त्या कराराचे पालन व्हावं', असं देखील यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


'पुन्हा यावर चर्चा कशाला व्हायला हवी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच हे ठरलं आहे, अंधारात ठरलेलं नाही', असा दावा देखील यावेळी संजय राऊत यांनी केला.


संजय राऊत यावर आणखी स्पष्टपणे, कठोर शब्दात आपली भूमिका मांडताना म्हणाले, 'आमचं ते आमचं तुमचं ते आमच्या बापाचं अशी आमची भूमिका नाही, मुख्यमंत्रीपद पहिलं कोणी ठेवायचं याबाबत भाजपकडून प्रस्ताव येऊ द्या, युती संदर्भात कोणतेही चुकीचे विधान आमच्या नेत्यांनी केलं नाही,, जे ठरलंय त्याच्यावरती काय द्यायचं नाही, असं आमचं म्हणणं आहे'.


अमित शहा यांच्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, 'अमित शहा राष्ट्रभक्त आहेत, राम भक्त आहेत, राम सत्यवचनी, एकवचनी होते, ते रामाच्या विचारांचे पालन करावे'.


सरकारवर ताशेरे ओढताना संजय राऊत म्हणाले, 'मी कुणाला घाबरत नाही, सरकार दोन गोष्टी करू शकते खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकू शकते किंवा अनेक ठिकाणी राजकीय खून केले जातात, मला त्याचीही पर्वा नाही, मी या दोन्ही गोष्टींना घाबरत नाही, पक्षासाठी लढणं, झुंज देणं हे माझं कर्तव्य आहे, मला पक्षाने खूप दिलं आहे, जे ठरलंय ते मागतोय वेगळं काही मागत नाही, पक्षासाठी बोलत असेल तर तुम्ही मान्य केले पाहिजे की मी उद्धव ठाकरे यांच्या संमतीने बोलतोय'


तसेच 'कोंडी आम्ही कशी फोडणार आम्ही जे घडलंय ते त्याची आठवण करून देतोय, चंद्रकांत पाटील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत,  त्यामुळे ते कोणत्या कोंडीविषय बोलतायत त्यांना माहिती, काही ठिकाणी बंडखोरांना सरकारकडून पाठबळ मिळाला युतीत अशा गोष्टी घडू नयेत पण त्या घडवल्या गेल्या, बंडखोर अपक्षांना घेऊन वाढून किती जागा वाढणार, फार ताणले तर तुटेल, हा मटक्याचा आकडा नाही, किती तुम्ही ताणणार', असं देखील राऊत म्हणाले.



संजय राऊत म्हणाले आमच्या समोर पर्याय आहे पण, 'आमच्या समोर पर्याय नाही असं नाही, परंतु ते पाप आम्हाला करायचं नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे, समान वाटा ठरल्यानंतर तडजोडीचा प्रश्न येतो कुठे' 


शरद पवार आणि बाळासाहेबांविषयी बोलताना राऊत म्हणाले, 'शरद पवार लोकप्रिय नेते आहेत, ही निवडणूक त्यांनी ज्या प्रकारे लढवली आहे, त्यामुळे पुन्हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले, पदावर आहेत म्हणून कुणी नेता नसतो, आज मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान आहे, पण उतरल्यावर टिकतो तो नेता, जसं ठाकरे कुटुंबियात आहे, तसं शरद पवारांच्या बाबतीत आहे.'


भाजपाविषयी बोलताना राऊत म्हणतात, 'मी भाजपा विषयी एक जरी चुकीचं विधान केलं असेल, तर ते माझ्यासमोर आणावं, देशात मंदी आहे आणि आम्ही सांगायचं सगळं आबादीआबाद आहे हे कशाला, मुख्यमंत्री भाजपचा असेल असं बोलण्याचा त्यांना अधिकार आहे, ओवेसी म्हणत होते सरकार आमचं येईल, केंद्रात भाजपचे सरकार आहे, महाराष्ट्रात त्यांच्या विचारांचा राज्यपाल आहे, म्हणून ते असं बोलू शकतात, मात्र लोकशाहीत स्पष्ट बहुमत आहे त्याचं सरकार बनतं.'