राऊतांची तोफ धडाडली; `कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी धमकी देतोय...`
Maharashtra-Karnataka border dispute : सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकाचे असावेत, अशी आमची मागणी आहे असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे.
Maharashtra - Karnataka border dispute : कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एक इंचही सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकाचे असावेत, अशी आमची मागणी आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी म्हटले आहे. बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात नवा वाद पेटलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या विधानंतर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता राज्यातील राजकारण पेटलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमपणे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिलाय. मुंबईत माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारवरही टीका केली आहे.
"महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमजोर सरकार अस्तिवात आल्यामुळे आणि सरकारचे प्रमुख तंत्रमंत्र आणि जोतिष्य यामध्ये अडकल्याने कर्नाटक आणि गुजरातमधून महाराष्ट्रावर असे हल्ले होत आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठामपणे भूमिका घेऊन उभे नाहीयेत. फक्त एकही गाव जाणार नाही असे बोलून चालत नाही. कर्नाटकच्या मुख्यंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. आतापर्यंत कोणत्याही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी हिंमत झाली नव्हती. गुजरातने महाराष्ट्राचे उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने गावे, तालुके पळवायचे. महाराष्ट्र सह्याद्रीच्या नकाशावरुन संपवून टाकायचा असे काही संगनमत आहे का?," असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
हे ही वाचा >> "सोलापूर आणि अक्कलकोटही आमचेच"; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा नवा दावा
"सरकार कमजोर असेल पण आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाराष्ट्रावर आलेले प्रत्येक संकट परतवून लावेल. आम्हाला रक्त सांडण्याची भीती नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी धमकी देतोय समजा, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा. तुमची बकबक बंद करा. आमचं सरकार जरी गुढग्यावर बसलेले असले तरी शिवसेना स्वाभीमानाने उभी आहे," असे संजय राऊत म्हणाले.
"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे सीमाभागाचा पदभार होता पण गेल्या 10 वर्षात ते तिथे का गेले नाहीत. किती मंत्री सीमाभागात गेले ते मला सांगा? चंद्रकांत पाटील कर्नाटकात जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात आणि त्यांचे कौतुक करुन येतात," असेही राऊत म्हणाले.
हे ही वाचा >> जत तालुक्यातील गावे कर्नाटकमध्ये जाणार? कर्नाटकच्या दाव्यावर गावकऱ्यांची स्पष्ट भूमिका
आता फक्त मुंबई मागायाची बाकी राहिलेय - अजित पवार
मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. आधीच्या काळात अशी वक्तव्ये होत नव्हती असे अजित पवार यांनी म्हटले होते. "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची गेल्या दोन दिवसांपासून जी वक्तव्ये येत आहेत त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला. कारण नसताना त्यांनी जत तालुक्यातील गावांबाबत वक्तव्ये केली आहेत. सातत्याने या लोकांकडून अशा प्रकारची वक्तव्ये करुन लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कडक भाषेत समज दिली पाहिजे. आधीच्या काळात अशी वक्तव्ये होत नव्हती. आता त्यांनी फक्त मुंबई मागायाची बाकी राहिलेय. पण महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करावा," असे अजित पवार यांनी म्हटले.