दिल्ली घडामोडीनंतर संजय राऊत - शरद पवार यांची भेट, महाआघाडीच्या भवितव्याबाबत केले हे ट्विट
शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीतील घडामोडीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी ट्विट केले.
मुंबई : देशाच्या राजकारणात कालचा दिल्लीतील दिवस महत्वाचा मानला जात आहे. राष्ट्र मंच नेत्यांची बैठक आणि राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रमुख उपस्थितीनंतर अनेक राजकीय अटकळे बांधिल गेली आहेत. मात्र, दिल्लीतील राजयकी घडामोडीनंतर राष्ट्रवादी आणि राष्ट्र मंचने स्पष्टीकरण दिल्यानंतर राजकीय चर्चा थांबल्या तरी शरद पवार यांनी काहीही भाष्य न केल्याने उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. आज शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीतील घडामोडीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी ट्विट केले. त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत भाष्य केले आहे.
आज मी शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेसंदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत, असे शरद पवार म्हणाले, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नसल्याचे या ट्विटच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या आघाडीत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने येणाऱ्या निवडणुकीत स्वबळाची जाहीर भाषा केली आहे. त्याला शिवसेने आणि राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या भूमिकेबाबत आघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर राऊत यांनी शरद पवार यांनी भेट घेतल्याने याला अधिक महत्व आले आहे.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दोन आठवड्यात तीन बैठका झाल्या. मुंबई आणि दिल्लीत या बैठका झाल्याने देशात तिसरी आघाडीची चर्चा सुरु झाली. त्यातच राष्ट्र मंचची दिल्लीत झालेली बैठक, यामुळे याला अधिक दुजोरा मिळू लागला. त्यामुळे देशात आणि राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले. तर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या म्हाडाची घरे टाटा रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. त्यामुळे आघाडीत-बिघाडी होणार अशी चर्चा सुरु झाली.
मात्र, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निर्णयाला स्थगिती देत म्हाडाच्या 100 घरांचा प्रश्न मार्गी लावला. आता संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वादावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे.