मुंबई : महाराष्ट्रानंतर झारखंड हे भाजपच्या हातातून निसटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी ताकद लावली होती. पण त्याचा त्यांना फायदा झाला नाही. गरिब आणि आदिवासी जनतेने भाजपला नाकारले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांना यश आले. भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा जोरदार टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंडची सत्ता राखण्यासाठी भाजपला यश आले नाही. मोदी आणि अमित शाह यांनी मोठी ताकद लावली होती. दोघांनीही झारखंडमध्ये ठाण मांडले होते. प्रचारातून मतदारांनपुढे राष्ट्रीय मुद्दे मांडत भुलथापा देण्याचा प्रयत्नही झाला. पण देशातील जनता जागृत झालेली आहे. झारखंडच्या जनतेने भाजपला नाकारले. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर झारखंडच्या जनतेने विश्वास दाखवल्याने झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार येताना दिसत आहे, असे संजय राऊत म्हणाले. 


महाराष्ट्रापाठोपाठ झारखंड गमावलेल्या भाजपने आता विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत भाजपचं देशातलं प्राबल्य घटल्याचं दिसतंय. २०१७मध्ये भाजपची देशाच्या ७१ टक्के भागावर सत्ता होती. मात्र दोन वर्षांत ती ३५ टक्क्यांपर्यंत घटलीय. भाजपचा प्रभाव कमी होत चाललाय का असा प्रश्न या निमित्तानं पुढे आला आहे. 


झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमोच्या आघाडीने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. काँग्रेस-झामुमो बहुमताच्या उंबरठा ओलांडला आहे. झारखंडमध्ये भाजप सत्तेबाहेर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप २६ जागांवर आघाडीवर आहे. गेल्या दोन वर्षांत भाजपची चार राज्यांमधून सत्ता गेली. आता झारखंडमध्येल्या सत्तेलाही सुरूंग लागण्याची चिन्ह आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला असला तरी जागा कमालीच्या कमी झाल्या होत्या. त्यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंडमधूनही सत्ता जाणार असल्याचं दिसंतय. त्यामुळे भाजपला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत आहे.