Sanjay Raut On Loksabha Speaker Election:  उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय स्थितीसंदर्भात दोन महत्त्वाची विधानं केली आहेत. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुढील काही काळात 4 राजकीय पक्षांमध्ये फूट पाडू शकतात अशी शक्यता राऊत यांनी थेट पक्षांची नावं घेत व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 'इंडिया' आघाडी चक्क मोदींचं सरकार ज्यांच्यामुळे आलं त्या पक्षाच्या उमेदवाराला समर्थक करण्याचा निर्णय घेऊ शकते असं म्हटलं आहे.


मोदी-शाह हे चार पक्ष फोडणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राऊत यांनी भाजपाच्या धोरणावर टीका करताना, भाजपा ज्यांच्याबरोबर एकत्र बसतो त्यांनाच संपवतो असा टोला लगावला आहे. "राहुल गांधी म्हणतात, आम्हाला हवं तेव्हा सरकार पाडू शकतो. याचा अर्थ समजून घ्या. जे एनडीएचं सरकार बनवलं आहे ते स्थिर नाही. मी ऐकलं आहे की चंद्राबाबू नायडूंनी लोकसभेचं अध्यक्षपद मागितलं आहे. त्यांच्याबरोबर जे डील झालं त्यानुसार हे ठरलं आहे. चंद्रबाबूंची ही मागणी योग्य आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदावर एनडीएमधील एखादी व्यक्ती नाही बसली तर सर्वात आधी नरेंद्र मोदी आणि अमित शाहा तेलगु देसम हा पक्ष फोडणार. हे काम सुरु झालं आहे. नितीश कुमार यांची जनता दल युनायटेड पक्ष फोडणार. चिराग पासवानचा पक्ष फोडणार. जयंत चौधरींचा पक्षही फोडणार. त्यांचं कामच हे आहे ज्यांच्याबरोबर बसतात त्यांनाच ते संपवतात. ज्यांचं मीठ खातात त्यांनाच संपवणार. आमचा हा अनुभव आहे," असं राऊत म्हणाले.


...तर इंडिया आघाडी त्यांच्या पाठीशी उभी राहणार


"नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिला आहे. ते टेकूवर बसले आहेत. राहुल गांधींनी सांगितलं आहे की आम्ही कधीही सरकार पडू शकतो. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक फार महत्त्वाची आहे. 2014, 2019 सारखी स्थिती आता नाहीये. राहुल गांधी म्हणतात की आम्ही सरकार कधीही पाडू शकतो याचा अर्थ समजून घ्या. हे सरकार टेकून उभं आहे. आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवणार. चंद्रबाबू नायडूंनी त्यांचा उमेदवार लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभा केला तर 'इंडिया' आघाडीमध्ये आम्ही चर्चा करु आणि चंद्रबाबू नायडूंच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. आम्ही असा प्रयत्न करणार की पूर्ण 'इंडिया' आघाडी चंद्रबाबूंच्या उमेदवाराच्या मागे उभी राहील," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.


नक्की वाचा >> 'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल


उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना मिळायला हवं


"या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदींना झिडकारलं आहे. नाकारलं आहे. भाजपाचा पराभव केला आहे. त्यांच्या झुंडशाहीचा, हुकूमशाहीचा, संविधानविरोधी भूमिकेचा पराभव केला आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपद पारदर्शकपणे निवडणं गरजेचं आहे. उपाध्यक्ष पद हे आता कायद्यानं, घटनेनं विरोधी पक्षांना मिळायला हवं," असंही राऊत म्हणाले.