'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल

Ravindra Waikar Kin Booked By Police: रविंद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभूत केलं. मात्र या केंद्रावरील मतमोजणी वादात अडकली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 16, 2024, 01:32 PM IST
'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल title=
वनराई पोलिसांना वायकरांच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला

Ravindra Waikar Kin Booked By Police: लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर-पश्चिम मुंबईच्या मतदारसंघात रविंद्र वायकर यांनी अवघ्या 48 मतांनी अमोल किर्तीकरांविरुद्धची निवडणूक जिंकल्याच्या प्रकरणाला वेगळं वळणं मिळण्याची शक्यता आहे. गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान मोबाईल नेण्यास मनाई असताना मोबाईल घेऊन जाणार्‍या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणुक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता या दोघांनी ईव्हीएम हॅक केल्याचा दावाविरोधी पक्षांनी केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत एक्स (ट्वीटर) हॅण्डलबरोबरच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये काही काळबेरं आहे का अशी शंका उपस्थित केली आहे.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अलीकडेच लोकसभेची निवडणुक पार पडली. यावेळी उत्तर-पश्‍चिम लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अमोल गजानन किर्तीकर आणि शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या थेट लढत झाली होती. शेवटपर्यंत चाललेल्या मतमोजणीदरम्यान या दोघांनी एकमेकांना चांगली लढत दिली होती. अखेर 48 मतांनी रविंद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र आता याच मतमोजणीसंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये एम. पंडिरकर आणि दिनेश गुरव यांचा समावेश आहे. यातील पंडिरकर हे रविंद्र वायकर यांचे नातेवाईक तर दिनेश निवडणुक अधिकारी असल्याचे सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांनाही चौकशीसाठी समन्स बजाविण्यात येणार आहे, असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सीसीटीव्हीमधून समोर आला हा प्रकार

गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान रविंद्र वायकर यांचे नातेवाईक एम. पंडिरकर हे मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रावर मोबाईन नेण्यास सक्त मनाई असताना त्यांना निवडणुक अधिकारी दिनेश गुरव यांनी मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविंद्र वायकर यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि निवडणुक अधिकार्‍यांविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी शहानिशा सुरु केली होती. मतदान केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्यांनतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध 188, 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नक्की >> मोदींना भाजपामधूनच विरोध? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'BJP च्या बैठकीत..'

'वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल ईव्हीएमशी कनेक्टेड' असल्याचा दावा

एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये, 'रविंद्र वायकर यांच्या एका नातेवाईकाकडे ईव्हीएम हॅक करु शकणारा मोबाईल होता' असा दावा करण्यात आला असून या बातमीचं कात्रण आदित्य यांनी शेअर केलं आहे. "एकदा गद्दार तो गद्दारच... उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर वळणावर आहे. कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशीही गद्दारी करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संपूर्णपणे तडजोड केलेल्या निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यास नकार दिला आहे. माझा अंदाज आहे की हा आणखी एक चंदिगडमधील गोंधळासारखा प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही नेहमी म्हणतो की भाजप आणि मिंधे टोळीला आपली लोकशाही संपवायची आहे. त्यांनी आपची घटना बदलायची आहे. हा गैरप्रकार हा त्यांच्या याच सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

या प्रश्नांची उत्तरं हवीत, काँग्रेसची मागणी

काँग्रेसच्या अधिकृत हॅण्डलबरोबरच राहुल गांधींनीही या प्रकरणी पोस्ट करत संबंधित प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने लक्ष घातलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. "ईव्हीएमसंदर्भात एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. मुंबईमध्ये एनडीएचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल ईव्हीएमशी कनेक्टेड होता. एनडीएचा हा उमेदवार अवघ्या 48 मतांनी जिंकला आहे. यावरुन प्रश्न असे उपस्थित राहतात की, एनडीएच्या उमेदवाराचे नातेवाईक त्यांचा मोबाईल ईव्हीएमसी कसा कनेक्ट करत होते? जिथे मतमोजणी होते तिथे मोबाईल पोहोचलाच कसा?" असं काँग्रेसने पोस्ट केलं आहे.

"प्रश्न अनेक आहेत ज्यामुळे संक्षय निर्माण होत आहे. निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे," असं काँग्रेसने म्हटलं आहे. राहुल गांधींनीही अशीच मागणी केली आहे.