प्रताप सरनाईकांच्या लेटर बॉम्बवर काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे. प्रताप सरनाईकांनी लिहिल्या पत्रावर संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राऊत म्हणाले, 'सरनाईक हे शिवसेनेच्या कुटुंबाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्ष त्यांच्या पाठी कायम उभा राहील.' असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
'प्रताप सरनाईक आणि त्यांचं कुटुंब सध्या त्रासात आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रनेचा वापर करून त्यांना त्रास देत आहे. त्यामुळे भाजपशी जुळवून घेण्याचं वैयत्किक मत त्यांनी व्यक्त केलं. पक्ष म्हणून भूमिका घेण्याचे आधिकार फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत.' आज संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राऊत यांना शिवसेनेत गटबाजी असल्याची चर्चा सुरु आहे का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला, तेव्हा राऊत म्हणाले, 'आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेक गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. हे सरकार पाच वर्ष काम करण्यासाठी सक्षम आहे.'
राऊत पुढे म्हणाले, 'महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत मजबुतीने उभे आहोत. सत्ता हातून गेल्यामुळे ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार. आघाडी तोडण्यात त्यांना कधीही यश मिळणार नाही. आघाडीचं सरकार कसं चालवावं त्याचा उत्तम फॉर्म्यूला महाराष्ट्रात आहे, ' असं राऊत म्हणाले.