देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केलंय. 'लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती... बच्चन, हम होंगे कामयाब... जरूर होंगे' असं आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी म्हटलं आहे. सध्या राऊत लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. दररोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आले आहेत. मात्र सोमवारी अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले. ट्विट मात्र त्यांनी नित्यनियमाने केलं...आणि कामयाब अर्थात यशस्वी होण्यात शिवसेना मागे राहणार नसल्याचं जणू त्यांनी नमूद केलंय. इतकंच नाही तर, संजय राऊत रुग्णालयात बसून उद्यासाठी अग्रलेख लिहित असल्याचा त्यांचा एक फोटोही समोर आलाय. या फोटोमध्ये संजय राऊत रुग्णालयाच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात डॉक्टरांकडून लावण्यात आलेल्या सुया स्पष्टपणे दिसत आहेत. याही अवस्थेत संजय राऊत शिवसेनेला सत्तास्थापनेत सहभागी करण्यासाठी सक्रीय दिसत आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आजचा दिवस हा राष्ट्रवादीसाठी 'करो या मरो' असाच आहे. भाजपा आणि शिवसेनेला सत्तास्थापनेची संधी देऊन त्यांच्या पदरी अपयश आल्यानंतर आता राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी संध्याकाळपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा वाय बी सेंटरमध्ये आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आता राष्ट्रवादीला शिवसेना पाठिंबा देणार का?  तिन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कोणता फॉर्म्युला मान्य होणार? याबाबत चर्चा रंगत आहेत तर शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास काँग्रेसला तो मान्य असेल का? मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस काही आडकाठी घालू शकतं का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा पुन्हा एकदा राजकारणाच्या खेळातच जाणार आहे. विजयी कोण होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


शिवसेनेचा गेम कुणी केला?


महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सोमवारी एकापाठोपाठ एक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेनं सरकार स्थापनेचा दावा केला, मात्र त्यासाठी आवश्यक संख्याबळ काही शिवसेनेला गोळा करता आलं नाही... त्यामुळं राज्यपालांनी आता सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीला मुदत दिलीय. राजकारण कशाला म्हणतात, याचा अनुभव महाराष्ट्रानं सोमवारी अनुभवला... राज्यपालांच्या भेटीसाठी शिवसेनेचे नेते राज भवनावर पोहोचले.. राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार... शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार... म्हणून जल्लोष सुरू झाला. मालाडच्या 'द रिट्रीट'मध्ये असलेल्या शिवसेना आमदारांपासून अगदी शिवसैनिकांनीही मिठाई वाटली... फटाके फोडले.


पण तासाभरातच जल्लोष संपला. शिवसेनेनं सरकार स्थापनेचा दावा केला खरा... पण बहुमतासाठी आवश्यक आमदारांचं संख्याबळ सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रं राज्यपालांपर्यंत पोहोचलीच नाहीत. शिवसेनेनं राज्यपालांकडं तीन दिवसांची मुदत मागितली. पण राज्यपालांनी मुदत वाढवण्यास साफ नकार दिला.


हातातोंडाशी आलेला घास शिवसेनेच्या तोंडातून निसटला. सरकार बनवण्यासाठी शिवसेनेची मदार होती ती सोनिया गांधींच्या काँग्रेसवर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर... पण काँग्रेस हायकमांडनं पाठिंबा देण्यास लावलेला विलंब आणि काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा करत बसलेली राष्ट्रवादी काँग्रेस यामुळं शिवसेनेचा गेम झाला.



त्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू होते की काय? अशी शक्यता निर्माण झाली. मात्र रात्री उशिरा राज्यपालांनी ५४ आमदार असलेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रवादीकडं सरकार स्थापन करण्याबाबत विचारणा केली. राष्ट्रवादीच्या नेते आधी राज भवनावर आणि तिथून शरद पवारांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानी पोहोचले. काँग्रेस आणि शिवसेनेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं.


महाराष्ट्राच्या राजकारणाचं पॉवर सेंटर असलेल्या शरद पवारांच्या कोर्टात पुन्हा चेंडू आलाय... या सत्तासंघर्षात शरद पवार नेमके कोणते फासे टाकतात आणि या पेचातून कसा मार्ग काढतात? याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.