`संजय...` सिर्फ नाम ही काफी है!
महाराष्ट्राच नाही तर देशाच्या राजकारणात सध्या एकच नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे आणि ते म्हणजे संजय राऊत.
मुंबई : महाराष्ट्राच नाही तर देशाच्या राजकारणात सध्या एकच नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे आणि ते म्हणजे संजय राऊत. राज्यातला सत्तास्थापनेचा पेच कायम असताना संजय राऊत हे रोज 'सामना'च्या अग्रलेखातून आणि मग पत्रकार परिषद घेऊन भाजपला लक्ष्य करतायत. शिवसेनेकडून फक्त संजय राऊतच भूमिका मांडत आहेत. तसं पाहायला गेलं तर, 'संजय' या नावाची फक्त राजकारणातच नाही तर क्रीडा आणि बॉलीवूडमध्येही चलती आहे. अनेक क्षेत्रांत 'संजय' हे नाव कायमच चर्चेत किंवा वादात असल्याचं पाहायला मिळतं.
संजय दत्त
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर होणआऱ्या घडामोडींमध्ये संजय राऊत महत्त्वपूर्ण भूमिका मांडताना दिसत असतानाच दुसरीकडे रुपेरी पडद्यावर इतिहासातील एक युद्ध मांडण्यासाठी अभिनेता संजय दत्त हासुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे. नावांमध्ये असणाऱ्या साम्यामुळे हे दोन्ही 'संजय' सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहेत.
आशुतोष गोवारिकर यांच्या अतिशय महत्त्वकांक्षी अशा 'पानिपत' या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटामध्ये संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. 'त्याची सावली पडताच मृत्यू ओढावतो...', असं कॅप्शन देत खुद्द संजूबाबानेच ऐतिहासिक पटातील त्याचा लूक सर्वांसमोर आणला.
अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेमुळे सध्या संजय दत्तची चर्चा सुरु असली तरी संजय दत्तचं संपूर्ण आयुष्यचं वादात आणि कायमच चर्चेत राहिलं आहे.
संजय निरुपम
एकेकाळी मुंबई काँग्रेस चालवणारे संजय निरुपम हे त्यांच्याच पक्षाला घरचा आहेर देण्यामुळे चर्चेत आले आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार करणाऱ्या काँग्रेसचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेसचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. तसंच या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल आणि मुंबईत ३-४ जागा सोडल्या तर इतर ठिकाणी काँग्रेसचं डिपॉझिट जप्त होईल, असा दावा संजय निरुपम यांनी केला होता. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना संजय निरुपम यांनी तर अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य केली होती.
संजय मांजरेकर
आपल्या रोखठोक मतांमुळे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे कायमच वाद ओढावून घेतात. वर्ल्ड कपमध्ये रवींद्र जडेजावर केलेल्या टीकेमुळे संजय मांजरेकर हे चर्चेत आले होते. रवींद्र जडेजानेही मांजरेकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. संजय मांजरेकर यांना त्यांच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल व्हायची वेळ अनेक वेळा आली आहे.
संजय कपूर
अभिनेता अनिल कपूर याचा भाऊ संजय कपूर याला बॉलीवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही. पण काहीच दिवसांपूर्वी अनन्या पांडेच्या ड्रेसवर केलेल्या कमेंटमुळे संजय कपूरला ट्रोल व्हायची वेळ आली. 'ड्रेस गिरने वाली है थोड़ा सावधान रहें।' असं संजय कपूर अनन्याला म्हणाला, पण संजय कपूरची ही कमेंट लोकांना मात्र आवडली नाही.
संजय काकडे
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हेदेखील त्यांच्या भाकितांमुळे चर्चेत असतात. शिवसेनेचे ४५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा संजय काकडेंनी नुकताच केला होता. 'विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २० जागा आणि राष्ट्रवादीच्या २० जागा येतील. दोन्ही पक्षाच्या मिळून ४० जागा आल्या तर शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायचं असेल, तर दोन्ही पक्षांना विलिनीकरणाशिवाय कोणताही पर्याय नसेल', असा दावा काकडेंनी केला होता.
महाभारतातील संजय
महाभारतातील संजय आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होते. धृतराष्ट्राला योग्य सल्ला द्यायचं काम ते करायचे. संजय यांना दिव्यदृष्टी प्राप्त होती, त्यामुळे युद्धक्षेत्रावरील सुरु असलेल्या गोष्टी ते महालात बसून राजांना सांगत होते. अंध धृतराष्ट्राने महाभारत युद्धाची प्रत्येक घटना संजयच्या वाणीने ऐकली होती. धृतराष्ट्राला युद्धाची माहिती देण्यासाठी व्यास मुनींनी संजयला दिव्यदृष्टी प्रदान केली असल्याची दंतकथा आहे.
संजय गांधी
भारतीय राजकारणातलं सगळ्यात वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणून संजय गांधी यांचं नाव घेतलं जातं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी १९७५ साली आणीबाणीचा निर्णय घेतला. या निर्णया मागचे खरे सूत्रधार संजय गांधी होते. १९७६ साली संजय गांधींनी नसबंदी मोहीम हाती घेतली होती. नसंबदीचा हेतू पूर्ण व्हावा यासाठी लोकांना पकडून आणले जायचे. यामुळे काँग्रेसवर नोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
संजय लीला भन्साळी
बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हेदेखील त्यांच्या प्रत्येक चित्रपटाआधी चर्चेत असतात. मग तो पद्मावतचा वाद असो किंवा त्यांच्या चित्रपटाचे सेट असो किंवा त्यांच्या चित्रपटांच्या सेटना लागलेल्या आगी असोत.
सर्वाधिक संजय
आधार इनोव्हेशन लॅबने दिलेल्या आकड्यांनुसार, महाराष्ट्रात सर्वात जास्त 'संजय' या नावाची लोकं आहेत. महाराष्ट्रात संजय नावाची एकूण ६ लाख १४ हजार ५५७ माणसं आहेत. आता एवढे संजय असल्यानंतर मग चर्चा तर होणारच.