मुंबई : नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे. सीबीआयने मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे. संजीव पुनाळेकर हे सनातन संस्थेचे वकील आहेत. शिवाय अनेक प्रकरणात अटकेतल्या हिंदुत्ववाद्यांचे वकील आहेत. पुनाळेकरांसोबत विक्रम भावेलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही मुंबईतून अटक केल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात अगोदरच अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या माहितीवरून ही अटक केल्याचं सांगण्यात येतं आहे. हत्येचा कट आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप पुनाळेकर आणि भावे यांच्यावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी नालासोपाऱ्यामध्ये सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे आरोपी होते. या दोघींची चौकशी झाली तेव्हा शरद कळसकरने आपणच नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर सीबीआयने शरद कळसकरची चौकशी केली, तेव्हा दाभोलकरांच्या हत्येसाठी जी बंदूक वापरली ती नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकर यांनी दिल्याचं कळसकर याने सीबीआयला सांगितलं. यावरूनच पुनाळेकर यांना अटक केली असल्याचा दावा सीबीआयच्या सूत्रांनी केला आहे. 


याप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना उद्या पुण्याच्या न्यायालयात हजर करणार आहेत.


नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. सीबीआयने हे पाऊल उशीरा उचललं असलं तरी त्याचं आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया अनिंसकडून देण्यात आली आहे. यामुळे नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या सूत्रधारांपर्यंत सीबीआय पोहोचेल, अशी अपेक्षा अनिंसने व्यक्त केली आहे. 


दरम्यान संजीव पुनाळेकर यांच्या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे. संजीव पुनाळेकर यांना अटक करणं हे षडयंत्र आहे, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला आहे. पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे, असं चेतन राजहंस म्हणाले. 


सध्या देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, मग पुनाळेकर यांना उगाच कोण अडकवणार? असा सवाल अनिंसचे संस्थापक, संघटक श्याम मानव यांनी केला आहे. तसंच श्याम मानव यांनी सीबीआयचे आभार मानले. संजीव पुनाळेकर ज्या पद्धतीने भूमिका मांडत होते, त्यावरून त्यांच्यावर संशय येत होता, असं श्याम मानव म्हणाले. सबळ पुरावे असल्याशिवाय या दोघांना अटक होऊ शकत नाही. एककीकडे प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाते, तेव्हा पुनाळेकर यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याशिवाय कारवाई होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया श्याम मानव यांनी दिली.