मुंबई : मे महिन्याची सुरुवात झाली असली तरीही या महिन्याच्या अखेरीस यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे वेध लागणं अपेक्षित होतं. काही दिवसांनी लवकरच आलेल्या गणेशोत्सवासाठी नव्या सजावटीपासून, मूर्तीपर्यंतची सर्वच आखणी करण्यासाठीची लगबग एव्हाना अनेकांच्या विचारांमध्ये सुरुही झाली असती. पण, जगभरात आणि मुंबईतही दिवसागणिक वाढणारं Coronavirus कोरोना विषाणूचं सावट पाहता हे चित्र काहीसं वेगळं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसमुळे येत्या काळात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या आणि उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या गणेशोत्सवावर सावट असलं तरीही हा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. उत्सव साजरा करण्याच्या या निर्णयावर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती ठाम असल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे उत्सव साजरा होणार असला तरीही त्यामध्ये अत्यंत साधेपणा जपला जाणार आहे ही बाब मात्र अधोरेखित करण्यात आली आहे. 


बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनीच हे अत्यंत महत्त्वाचं आवाहन करत सार्वजनिक मंडळांनी हा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यावर भर देण्याबाबतची विचारणा केली. यावेळी त्यांनी प्लेगच्या साथीदरम्यान अगदी साधेपणाने साजरा करण्यात आलेल्या गणेशोत्सवाला दाखला दिला. बहुतांश प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या या आवाहनाचं समर्थनही केल्याचं म्हटलं जात आहे. 


 


मुंबईत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाबाबत सकारात्मकता दर्शवत जेव्हा जेव्हा या शहरासमोर कोणतंही मोठं संकट आलं आहे, तेव्हा प्रत्येक वेळी मंडळांकडून सामाजिक भान जपण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी जाणिवपूर्वक मांडला. गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी आणि त्यातून फोफावणारा कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पाहा भाविक आणि कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्च केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.