आता वायफळ खर्च टाळा, काटकसर करा; पवारांचा सल्ला
आपल्याला पुढील काही दिवस वैयक्तिक जीवनामध्ये काटकसरीने राहण्याचा विचार करावा लागेल.
मुंबई: लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर देशासमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी वायफळ खर्च टाळून काटकसर करण्यावर भर दिला पाहिजे. अन्यथा उद्या आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. त्यांनी सोमवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी लॉकडाऊनंतर येऊ घातलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केले. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगात आर्थिक मंदी आल्याचे जाहीर केले होते. ही आर्थिक मंदी २००९ इतकीच किंवा त्याहून अधिक भयानक असल्याचे IMF ने म्हटले होते.
शरद पवार यांनीही आज या भाकिताला एकप्रकारे दुजोरा दिला. कोरोनाच्या आरोग्यविषयक संकटातून उद्या मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. आज जवळपास सर्व व्यवसाय, कारखानदारी, रोजगार, शेती, व्यापार बंद आहेत. या सगळ्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे आपण आतापासूनच या सगळ्या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जायचे, याचा विचार सुरु केला पाहिजे.
त्यासाठी आपल्याला पुढील काही दिवस वैयक्तिक जीवनामध्ये काटकसरीने राहण्याचा विचार करावा लागेल. वायफळ खर्चही टाळावे लागतील. आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर उद्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचा प्रसंग येईल, असे शरद पवार यांनी म्हटले.