SBI : एसबीआयच्या ग्राहकांना पुन्हा झटका, तुमचा EMI आणखी वाढणार
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) खातेधारकांना मोठा झटका दिला आहे.
मुंबई : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) या बँकेच्या खातेधारकांसाठी वाईट बातमी आहे. बँकेने एमसीएसआरमध्ये (Mclr) 0.15 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. त्यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणं महागणार आहे. तसेच गृहकर्जाचा हफ्ताही वाढणार आहे. त्यामुळे आता कर्जदारांना खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे. या वाढीव व्याज दराच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून 15 नोव्हेंबरपासून करण्यात आली आहे. (sbi hikes mclr by up to 15 bps across tenors making consumer loans costlier)
हफ्ता वाढणार
एमसीएलआर वाढीसोबत टर्म लोनवरील हफ्ता वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश कर्ज ही मार्जिनल कॉस्ट बेस लेंडिग रेटवर आधारित असतात. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याने वैयक्तिक, गृह कर्ज आणि वाहन कर्ज महागण्याची शक्यता आहे.
बँकेने 1 वर्षाच्या एमसीएलआरमध्ये 0.10 ने वाढ केली आहे. त्यामुळे आता हा दर 08.05 टक्के इतका झाला आहे जो आधी 07.95 टक्के इतका होता. तर 2 आणि 3 वर्षांच्या एमसीएलआरमध्ये 0.10 ने वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता हा दर 8.35 टक्के इतका झालाय. याबाबतची माहिती एसबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
एमसीएलआर म्हणजे काय? (MCLR)
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर ही प्रणाली विकसित केली आहे. एमसीएलआरच्या आधारावर बँक व्याजदर निश्चित करते. याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारावर व्याजदर ठरवला जायचा.