दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांचा कोरोनामुळे तेलंगणात मृत्यू झाल्यानंतर आता महाराष्ट्रातून या कार्यक्रमात कोण सहभागी झालं होतं का? याचा राज्य सरकार शोध घेत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमात कार्यक्रमात दीड-दोन हजार लोक सहभागी झाले होते असा अंदाज आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले काही लोक इंडोनेशिया आणि मलेशियामधूनही आले होते. त्यांनी २७ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात क्वाललांपूर इथं झालेल्या कार्यक्रमातही भाग घेतला होता अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर हा गट दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला. या कार्यक्रमात सहभागी झालेले ६ जण तेलंगणामध्ये परतल्यानंतर त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे. निजामुद्दीनमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, नेपाळमधील १४ लोकांना पोलिसांनी फिरत असताना पकडून क्वारंटाईन केलं आहे.


कोरोनामुळे संपूर्ण जग हादरलं असताना आणि त्यापासून वाचण्यासाठी धडपड करत असताना दिल्लीत निजामुद्दीनमध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या जबलीगी जमात या धार्मिक कार्यक्रमानं देश हादरला आहे.


तेलंगणामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता या कार्यक्रमात सहभागी झालेले लोक वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहू लागले आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठच्या परतापूरजवळच्या काशी गावात एका बंद घरात महाराष्ट्र, नेपाळ, बिहार आणि दिल्लीतील १४ जमाती लपलेले आढळले. त्यांची माहिती मिळताच परतापूर पोलिसांनी डॉक्टरांची टीम घेऊन तिथं पोहचले आणि त्यांची तपासणी करून नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवले. या सर्वांना त्याच घरात क्वारंटाईन करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे हे लोक गावकऱ्यांनाही भेटल्याचं समजतं. त्यामुळे यांच्यापैकी कुणाला कोरोनाची बाधा झाली असेल तर ही साखळी पुढे गावकऱ्यांपर्यंत पोहचण्याचीही भीती आहे. पोलिसांनी १४ लोक लपले होते त्या घरमालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रियादेखिल सुरु केली आहे.


निजामुद्दीनमधील कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकही सहभागी झाले असू शकतात. त्यामुळे निजामुद्दीनमधून महाराष्ट्रात कोणी परतलेले असतील तर त्यांचा शोध आता घेतला जाणार आहे.