सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सेबीने त्यांना नोटीस बजावली आहे.
मुंबई : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशमुख यांनी लोकमंगल या संस्थेची खाती गोठवण्याबाबत सेबीने नोटीस बजावली आहे. लोकमंगलचं डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्याबाबत सेबीने ही नोटीस जारी केली आहे. तसेच अन्य सात जणांनाही सेबीने नोटीस बजावली आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या 'लोकमंगल' संस्थेने कसे लाटले अनुदान?
गुंतवणुकदारांचे 75 कोटी रुपये परत करण्याचे 16 मे 2018 रोजीचे आदेश लोकमंगलने पाळले नसल्यामुळे सेबीने कारवाईचा बडगा उगारला आहे. सहा महिन्यांनंतर लोकमंगलने सेबीच्या आदेशाला उत्तरही दिलेले नाही. लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, नोटीशीमध्ये देशमुखांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, दूध भुकटी बनवण्यासाठी ज्या प्रक्रिया उद्योगांच्या नावे अनुदान घेतले, त्यातील ४ संस्था बंद आहेत. तर एक संस्था अस्तित्वात नसल्याचे दिसून आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचं खोटे समंतीपत्र दिले. बनावट अकृषीक प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. बांधकाम विभागाचे बनावट प्रमाणपत्र आणि कारखाना नोंदणीचं बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले. त्यामुळे हा सर्व बनाव असल्याचे दिसून येत आहे.
बोगस प्रस्ताव सादर करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, सरकार लोकमंगलवर मेहरबानी दाखवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. लोकमंगल वैध कागदपत्रांसह पुन्हा प्रस्ताव दाखल करू शकते, अशी खास सूट देत सरकारने या संस्थेवर मेहरनजर दाखवली होती. त्यावर आता आक्षेप घेण्यात येत असून, सहकारमंत्री सुभाष देशमुखांसह लोकमंगलच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.