मुंबई : महाराष्ट्र राज्यात आणखी एक भूकंप होण्याची चर्चा आता रंगू लागली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली आहे. सुमारे दोन तास बैठक झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेकडून भेटीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी काल एक सूचक ट्विट केले होते. त्यात त्यांनी एक शेर पोस्ट केला होता. भेटीआधीचे हे सूचक ट्विट होते, का याची उत्सुकता आला लागली आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय भूंकपाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या भेटीमागचे अनेक तर्क काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊनच ही भेट झाली होती, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेण्याचा संजय राऊत यांचा विचार होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'ठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असे स्पष्टीकरण विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.


दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकते, आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली होती. प्रवीण दरेकर यांना विचारले असता, तूर्तास तरी ही भेट ही प्राथमिक स्तरावर होती असे त्यांनी म्हटले आहे. पण आत्ताच या भेटीबाबत काही सांगता येणार नाही, असे प्रवीण दरेकर यांनी आधी स्पष्ट केले होते. 



महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल युतीच्या बाजुने लागला. मात्र, मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये ताटातूट झाली. त्यानंतर शिवसेनेने फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत केले. तसेच तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली. ज्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीना काही कारणाने कुरबूर सुरु आहे. त्यामुळे याभेटीबाबत चर्चा अधिक रंगत आहे.


भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आताच काहीही निष्कर्ष काढले जाऊ नयेत. या भेटीचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. जरी पक्ष वेगळे असले तरी भेटी-गाठी होतच राहतील. राजकीय वाद असतात. पण भेटीगाठी वाढल्या तर कटुताही कमी होते. त्यामुळे याचा वेगळा अर्थ काढू नये. शिवसेनेसोबत आम्ही फक्त राजकीय दृष्ट्या वेगळे झालेलो नाही तर मनानेही वेगळे झालो आहोत. त्यामुळे इतक्या सहजासहजी सत्तेसाठी ही बैठक असेल असे वाटत नाही. तसे भाजप कोणत्याही कार्यकर्त्याला हे वाटणार नाही, असे मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.