अनिल अंबानींना धक्का! आणखी एक कंपनी बुडाली, NCLT कडून संपत्ती विकण्यासाठी मंजुरी
मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीचं ट्रेडिंग बंद झालं आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) काही संपत्तीची विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतंच त्यांच्या रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी बोली लावण्यात आली होती. दरम्यान आता दिवाळखोर झालेली त्यांची आणखी एक कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या काही रिअल इस्टेट संपत्तीच्या विक्रीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) परवानगी दिली आहे. अनिल अंबानींच्या कंपनीने शेअर मार्केटला याची माहिती दिली आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्सने सांगितलं आहे की, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई खंडपीठाचा आदेश, कंपनीच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने अर्जासोबत जोडला होता, ज्यामध्ये कंपनीच्या काही मालमत्तेच्या विक्रीसाठी मंजुरी मागितली होती. आता एनसीएलटीने त्याला मान्यता दिली आहे.
रिलायन्स कम्यनिकेशनच्या कोणत्या संपत्तीती विक्री?
रिलायन्स कम्यनिकेशनच्या ज्या संपत्तीची विक्री केली जाणार आहे, त्यात चेन्नईतील मुख्यालयाचा समावेश आहे. याशिवाय चेन्नईत 3.44 एकरची जमीन आहे. याशिवाय पुण्यातील 871 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या भुवनेश्वरमधील कार्यालयाची जागाही विकली जाणार आहे. कॅम्पियन प्रॉपर्टीजमधील गुंतवणूक आणि रिलायन्स रियल्टी शेअर्समधील गुंतवणूकही विकली जाणार आहे.
शेअर बाजारमधील ट्रेडिंग बंद
शेअर बाजारात रिलायन्स कम्युनिकेशनची ट्रेडिंग बंद झाली आहे. बऱ्याच काळापासून या शेअर्सचं ट्रेडिंग 2.49 रुपयांवर बंद आहे. BSE वर ही ट्रेडिंग आता बंद करण्यात आली आहे. 11 जानेवारी 2008 ला कंपनीचे शेअर 800 रुपये प्रती शेअरचा व्यवहार करत होते. पण आता 2.49 रुपयांवर बंद आहे. अशाप्रकारे शेअर्समध्ये तब्बल 99 टक्क्यांची घट झाली आहे.
कंपनी बुडण्यामागे कारण काय?
मुकेश अंबानी यांनी 2016 मध्ये रिलायन्स जिओला लाँच केलं होतं. यानंतर अनेक लोक जिओकडे वळू लागले होते. यामुळे रिलायन्स कम्युनिकेशनचे युजर्स सतत कमी होत होते. अखेर रिलायन्स कम्युनिकेशनपासून लोक कायमचे दूर हटले. याचा परिणाम कंपनी दिवाळखोर झाली आणि बुडाली.