कंगना रानौत प्रकरण, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पाऊण तास बैठक
वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. दोघांमध्ये सुमारे पाऊण तास झाली बैठक झाली. कंगना रानौत प्रकरणासह, मराठा आरक्षणासंदर्भात आलेल्या निर्णयावर चर्चा झाली. तसंच कंगनाचा विषय जास्त वाढवण्यात अर्थ नसल्याचं सुत्रांकडून सजतंय.
सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय आल्यानंतर बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली.
कंगनाच्या मुंबई, महाराष्ट्र विधानानंतर शिवसेना आक्रमक झाली असून कंगना राणौतविरुद्ध शिवसैनिकांकडून विमानतळावर आंदोलन करण्यात आलं. कंगनाविरोधात विमानतळावर कोणतंही आंदोलन करु नका, असा आदेश शिवसेना नेतृत्वाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता. सूचना देऊनही आंदोलन केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे कंगनाच्या विषयावर बोलू नका, असा सक्त आदेश मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर कंगना राणौत वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर संजय राऊत माहिती नाही, असंच उत्तर दिलं. 'आज मी दिवसभर ऑफिसमध्ये होतो. मी काहीही पाहिलं नाही, मला आज काहीच माहिती नाही,' असं राऊत म्हणाले.
कंगना वादावर संजय राऊतांचं मौन
दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली असताना, मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. याबाबत बोलताना शरद पवार यांनी कंगनाच्या कार्यालयातील बांधकाम कारवाईबाबत फारशी माहिती नसल्याचं सांगितलं. पण सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला आपण संधी देतो, असंही पवार म्हणाले.
कंगनावर आता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला संधी - शरद पवार
शिवसेना आणि कंगना यांच्यातील वाद आता आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत.