Sharad Pawar : शरद पवार गटाला नवं नाव मिळालंय. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' (NCP Sharadchandra Pawar) असं नवं नाव पवार गटाला मिळालंय. राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) हे नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे (Election Commission) नवीन पक्षासाठी तीन नावांचा प्रस्ताव दिला होता. तिन्ही नावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवारांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये पहिलं नाव 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' असं देण्यात आलं होतं. तर 'वटवृक्ष' या चिन्हासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तीन नावांचे होते पर्याय
शिवसेनेच्या फुटीनंतर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचं नाव त्यांच्या पक्षाच्या नावात आहे तसं नवीन पक्षाचे नाव घेताना पक्षाच्या नावात शरद पवार नाव असावे यासाठी शरद पवार गटाचे अनेक नेते आग्रही होते.  शरद पवारांच्या गटाने जी नावं निवडणूक आयोगाकडे दिली होती त्यात शरद पवार असं नाव असावं यावर एकमत होतं. यासाठी तीन नावांचा पर्यायावर विचार करण्यात आला.  'राष्टवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार',  राष्ट्रवादी शरद पवार' आणि 'शरद पवार स्वाभिमानी पक्ष' अशा तीन नावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.. यपैकी  'राष्टवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' हे नाव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलं. निवडणूक आयोगाने या नावाला मान्यता दिली आहे. 


निवडणूक आयोगाचा निकाल
25 वर्ष शरद पवारांच्या ताब्यात असलेला राष्ट्रवादी पक्ष फक्त 7 महिन्यात चिन्हासहित अजित पवारांना मिळाला. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचा निर्णय दिला. शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का होता. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हासाठी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय दिला.


जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना बहाल करण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला. शरद पवार गटानं या निकालावर तीव्र आक्षेप घेतलेत. शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. 84 वर्षांच्या माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटानं आधीच घेतलाय.


राष्ट्रवादीच्या कार्यालयावरही ताबा?
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गट मुंबईतल्या बेलार्ड इस्टेटमधलं राष्ट्रवादीचं मुख्यालयही ताब्यात घेणार का याकडे लक्ष लागलंय. नियमानुसार राष्ट्रवादी अधिकृत पक्ष अजित पवार गटाकडे आल्यानं मुख्यालयही दादांकडे येणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचं मुख्यालय हे वेल्फेअर ट्रस्टचं नसून पक्षाच्या मालकीचं असल्यानं ते अजित पवार गट ताब्यात घेईल अशी शक्यता वर्तवली जातेय. काही दिवसांनंतर यासंदर्भात अजित पवार गटाकडून हालचाली सुरु होतील असं सूत्रांकडून समजतंय.