महिन्याभरात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं दुसरं पत्र
या पत्रात पवारांनी दुष्काळ दौऱ्यावर आलेले अनुभव आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सरकारला सूचना केल्या आहेत
दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळातील उपाययोजनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. पवारांनी दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे दुसरं पत्र आहे. या पत्रात पवारांनी दुष्काळ दौऱ्यावर आलेले अनुभव आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सरकारला सूचना केल्या आहेत. यापूर्वीही शरद पवार यांनी ४ मे रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं.
पवारांनी आजच्या या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहुयात...
- चारा छावणीसाठी प्रति जनावर दिले जाणारे अनुदान कमी असून त्यात वाढ करण्याची पत्रात मागणी
- टँकरने केला जाणारा अपुरा पाणीपुरवठा, टँकरच्या अनियमित फेर्या, अशुद्ध पाणीपुरवठा याबाबत पत्रात उल्लेख
- दौरा केलेल्या भागातील अनेक ठिकाणचे पाझर तलाव, मध्यम प्रकल्प दुरुस्त करण्याची मागणी
- दुष्काळग्रस्त भागात अद्याप रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याबाबत पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष
- शेतकऱ्यांना फळबागा वाचवण्यासाठी २०१२-१३ च्या दुष्काळात हेक्टरी ३५ हजार रुपये अनुदान दिले होते, तसे अनुदान देण्याची मागणी
- शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची तक्रार
- पिक विमा भरूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याची पत्रात तक्रार