नवीन पिढीच्या हाती नेतृत्व देणार - शरद पवार
दिवाळीनंतर राष्ट्रवादी सर्व उमेदवारांची बैठक घेणार आहे. त्यानंतर पुढील दिशी ठरणार.
मुंबई : दिवाळीनंतर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सर्व उमेदवारांची बैठक घेण्यात येईल. निवडणुकीनंतरची धोरणात्मक आखणी केली जाईल. त्यानंतर जनमत पाहता अधिक जोमाने काम करून नवीन पिढीच्या हाती नेतृत्व देण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज आहे. दिवाळी झाल्यावर यासंबंधी वाटचाल करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. याबाबत तसे ट्विट केले आहे.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला आहे, त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करतो. निवडणुकीत महाआघाडीच्या सर्व घटकांनी मनापासून प्रयत्न केले. प्रत्येक कार्यकर्त्याचे मी अंतःकरणपूर्वक आभार मानतो, असे पवार म्हणालेत. दरम्यान, निवडणुकीत किती टोकाची मते मांडायची याला काही मर्यादा असते. पण यावेळी प्रचाराची सीमा विरोधकांकडून ओलांडली गेली. जे पक्ष सोडून गेले आणि निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून उभे राहिले, त्यांच्या बाजूने जनतेने कौल दिलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार आहे. तसेच राष्ट्रवादी सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. सरकार स्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल. भाजप-शिवसेनेला कौल मिळाला आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. त्यामुळे तरुण नेत्याकडे विरोधी पक्षनेते पद असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.