मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर शरद पवार आज दुपारी २ वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पण शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाण्याआधीच ईडीने कठोर भूमिका घेतली आहे. शरद पवार आरोपी आहेत, ईडीमध्ये येण्याबाबत पवार ठरवू शकत नाहीत. चौकशीला बोलावल्यानंतरच पवारांना यावं लागेल, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्धार शरद पवारांनी केला असला तरी त्यांना कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शरद पवारांच्या ईडी ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.


ईडी कार्यालयात जाण्याआधी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, तसंच अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखावी, असं पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.