Sheetal Mhatre Viral Video : खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा? नव्या आरोपाने खळबळ
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फिंग केलेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चार जणांना अटक तर एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.
Sheetal Mhatre Viral Video : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाता वेगवान घडामोडी घडताय. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची (SIT) घोषणा केली आहे. काल विधीमंडळात मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ही माहिती दिली. तर आतापर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चार जणांना अटक केली आहे. तर एकाला ताब्यात घेतलं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे साईनाथ दुर्गे (Sainath Durge) यांना काल मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन (Mumbai Airport) ताब्यात घेतलं. दरम्यान, आता याप्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे.
वरुण सरदेसाईंचा आरोप
आता याप्रकरणात ठाकरे गटाने (Thackeray Group) नवा आरोप केला आहे. शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे युवानेते वरून सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मॉर्फ (Sheetal Mhatre Viral Video) केलेला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे, तो समोर आला पाहिजे असं वरुण सरदेसाईंनी म्हटलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांचे चिरंजीव राज सुर्वे (Raj Surve) याने तो संपूर्ण व्हिडिओ त्याच्या फेसबुक पेज वर लाईव्ह (Live on Facebook Page) केला होता. त्यामुळे या प्रकरणी कोणाला अटक व्हायची असेल तर ती राज सुर्वे यांना व्हायला पाहिजे अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केलीय.
मुंबई पोलीस सक्षम आहेत, ते खऱ्या आरोपीला अटक करतील. कारण हा व्हिडिओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवल्याचा दावा ही सरदेसाई यांनी केला आहे. जे नेते आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम आहे. त्यांच्यावर रोज आरोप होत आहे, कारवाया केल्या जात आहे. सध्या केंद्र तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत.मात्र ते नेते भाजपमध्ये गेले की त्यांच्यावरील कारवाया थांबतात.. जनता हे सगळं पाहत आहे.. जनतेला हे रुचलेलं नाही आणि त्यामुळेच ठीकठिकाणी भाजपचे स्वतःच्या गडामध्येच पराभव होत असल्याचे सरदेसाई म्हणाले.
संजय राऊत यांचीही टीका
दरम्यान या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शीतल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधातच सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित व्हायरल व्हिडीओ खरा आहे की खोटा आहे याचा तपास लावा. जर तो व्हिडीओ खरा असेल तर जाहीर कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे कोणी अश्लील वर्तन करुन समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करणार असतील तर भारतीय कायद्यांतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाचा महाविकास आघाडीतील कोणत्याही घटकपक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याशी काहीही संबंध नसल्याचंही राऊत म्हणालेत.