शिंदे - फडणवीस सरकारची आज बहुमत चाचणी; शिवसेना आमदारांच्या मतदानाकडे सर्वांच लक्ष
शिंदे आणि फडणवीस सरकार यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर आज या सरकारसाठी आजच दिवस महत्त्वाचा असणार आहे.
सागर कुलकर्णी, मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकार यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर आज या सरकारसाठी आजच दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार आहे. सकाळी अकरा वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच बहुमत चाचणीचा प्रस्ताव विधिमंडळामध्ये ठेवला जाईल त्यानंतर आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले जाईल. विरोधी बाकाकडून पोल मागितला असता प्रत्येक आमदार उभारून क्रमांक पुकारेल त्यानुसार सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधक तटस्थ अशा आमदारांची गणना केली जाईल. कालच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणुक जिंकलेल्या शिंदे फडणवीस सरकारने बहुमत चाचणी जवळपास जिंकल्यासारखी आहे.
बहुमत चाचणी सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, जयंत पाटील बाळासाहेब थोरात, नाना पटोले, आदित्य ठाकरे यासह वेगवेगळे नेते भाषण करतील. विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून याबाबत आज विधिमंडळात अधिकृत घोषणा केली जाईल. तर विधानसभा तालिकाअध्यक्षपदी इतर विधानसभा सदस्य कोण असतील त्यांची नावे विधिमंडळात सांगतील. या सर्व कार्यक्रम नंतर राष्ट्रगीताने समारोप होईल.
शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे असून प्रतोद म्हणून भरत गोगावले यांचाच आदेश ग्राह्य धरला जाणार आहे. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तशा स्वरूपाचे पत्र दिल्याने, आता आजच्या दिवसात शिवसेनेत राहिलेले 16 आमदार नेमकी भूमिका काय घेतायेत याकडेही देखील लक्ष आहे.