मुंबई : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिक गहिरे होत चालले आहे. त्याचवेळी विरोधी गटातही राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. गेल्या 48 तासांत असे काही घडले की ज्याची कोणाला कल्पनाच नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारला मोठा हादरा दिला. त्यांनी बंडाचे निषाण फडकवत उद्धव ठाकरे यांचीच सत्ता धोक्यात आणली. मात्र, त्यानंतर राज्यात वेगळे चित्र दिसून येत आहे. शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आमचा नेते उद्धव ठाकरे असल्याचे सांगत 'मातोश्री'बाहेर रात्री मोठी गर्दी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मातोश्री येथे काही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर पोहोचल्यानंतर शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली.


दरम्यान, आपल्याला 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र, हा आकडा गाठण्यात एकनाथ शिंदे यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दोन दिवस झाले तरी शिंदे गटाने सत्तेबाबत काहीही हालचाली केलेल्या दिसून येत नाहीत. आज काही शिंदे समर्थक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले. त्याआधी गुजरातमधील सूरत येथे एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार होते. त्यानंतर त्यांनी आसाममधील गुवाहटी येथे आपला तळ हलवला. तेथून आता सूत्र हलविण्यात येत आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना  भावनिक आवाहन केले आहे. माझे काही चुकले असेल तर मला सांगा, मी पदावरुन आणि सत्तेतून बाजुला होतो. असं बाहेरुन किंवा सोशल मीडियावरुन नको. माझ्या समोर या आणि बोला. मी खुर्ची तात्काळ खाली करतो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारी निवासस्थान वर्षा बंगल्यावरुन  'मातोश्री'कडे प्रयाण केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंबरोबर संपूर्ण कुटुंबीय आहे. तर वर्षा ते मातोश्री शिवसैनिकांची मोठी गर्दी दिसून आली. शिवसेना झिंदाबादच्या घोषणा तर भगवे झेंडे घेऊन शिवसैनिक उपस्थितीत होते. आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत, असे यावेळी शिवसैनिकांनी स्पष्ट केले.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडलं. ते आता मातोश्री बंगल्यावर राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी वर्षाला जय महाराष्ट्र करून मातोश्रीची वाट धरली. त्यावेळी शिवसैनिकांनी वर्षाबाहेर गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांनी सर्वांना बाहेर येऊन नमस्कार केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली.  उद्धव ठाकरे यांच्या गळ्याभोवती शाल गुंडाळलेली होती. उपस्थित शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांवर फुलांचा वर्षाव केला. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे एका गाडीतून मातोश्रीच्या दिशेनं रवाना झाले. वर्षा ते मातोश्री या मार्गात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी ठाकरेंच्या स्वागतासाठी दुतर्फा गर्दी केली होती.