मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्याचे आदेश कंत्राटदार एल अँड टी कंपनीला दिले आहे. त्यामुळे आता शिवस्मारकाचे काम आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. पर्यावरणवाद्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाचे काम थांबवण्याचे तोंडी आदेश सरकारला दिले होते. या निर्णयानंतर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी तत्काळ बैठक बोलावली. तसेच बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं ही नामुष्की ओढवल्याचे खापर विनायक मेटे यांनी फोडले आहे. शिवस्मारकासाठी पर्यावरण परवानगी देतांना जनसुनावणी घेण्यात आली नाही, या मुद्यावर न्यायालयाने कामाला स्थगिती दिली. लवकरच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मेटे यांनी सांगितले आहे.


शिवस्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचा वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचा वाद राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात गेला. न्यायाधिकरणाने याप्रकरणी याचिका दाखल करून घेतल्या. राज्य आणि केंद्र शासनाच्या एकूण सात विभागांना खुलासा करण्याच्या नोटीसा पाठवल्या. याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी या नोटीसा पाठवल्या होत्या. या प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरण खात्याच्या ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला आहे. त्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आल्याचा युक्तिवाद याचिका दाखल करताना केला होता. त्यावर राज्य आणि केंद्र सरकारला याबाबत खुलासा करण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले.


सरकारने बेकायदेशीररित्या परवानग्या मिळवल्या आहेत. त्या रद्द करण्याची मागणी याचिकेत केली होती. शिवाय सर्व परवानग्या नव्याने देताना तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली होती. सरकारने पर्यावरण विभागाकडे सादर केलेल्या अहवालात याठिकाणी मासेमारी होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याउलट येथे मासेमारी होते. ४० प्रकारचे खेकडे हे येथील जैवविविधतेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रकल्प याठिकाणी राबवल्यास नक्कीच ही वैविधताही नष्ट होईल, अशी शक्यता याचिकाकर्ते आणि पर्यावरण संवर्धक प्रदीप पाताडे यांनी व्यक्त केली होती.


कसे असणार हे शिवस्मारक?


ऐतिहासीक वारसा जपण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पाडले. मुंबईत गिरगाव चौपाटीजवळची जागा शिवाजी महाराज यांच्या स्मारक होणार आहे. शिवाजी महाराज यांच्या जन्मापासूनचे राज्याभिषेकापर्यंत घटना दाखवणारे प्रत्यक्ष जिवंत देखावे यात असणार आहेत. येथे शिवकाल उलगडवून दाखवणारे मोठे कला संग्रहालय आणि ग्रंथालयही असणार आहे. तसेच या भागात अँपीथीअटर, साउंड अँड लाईट शो, थ्री डी आयमॅक्स थिएटर असणार आहे. तसेच अत्यंत आकर्षक मत्सालय या ठिकाणची असणार आहे.


किती क्षेत्रावर असणार शिवस्मारक!


१६.८६ हेक्टर आकाराच्या खडकावर हे स्मारक असणार आहे. ही जागा गिरगाव चौपाटीपासून ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे. या स्मारकाच्या ठिकाणी जाण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणाहुन बोटीच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. जलदुर्गाच्या तटबंदीला साजेशी अशी या स्मारकाची भिंत असणार आहे. तसेच भव्य प्रवेशद्वारही असणार आहे. स्मारकात प्रवेश केल्यावर राज्याची कुलदैवत आणि छत्रपती यांचे आदरस्थान असलेल्या तुळजाभवानीचे भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे.