मुंबई: आता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी शिजत आहे. जुन्या मित्राबरोबर जुळवून घेण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. भाजपपासून (BJP) दूर गेलेली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनविणारी शिवसेना  (Shiv Sena) पुन्हा आपल्या जुन्या मित्रपक्षाकडे झुकली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. याबाबतचे संकेत दोन्ही बाजूने येत असल्याचे मिळत आहे. आता भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलेय. शिवसेना भाजपचा शत्रू नाही, योग्य वेळी निर्णय घेईल, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.


'आम्ही शत्रू नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले की, भाजप पक्ष आणि माजी मित्रपक्ष शिवसेना काही शत्रू नसूनही त्यांच्यात काही मुद्द्यांबाबत मतभेद आहेत. राजकारणात काही जर तर असं होत नाही. शिवसेनेबरोबर पुन्हा जाण्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिले आहे.


हे दोन माजी सहकारी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतला जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीबद्दल आणि शिवसेनेत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता विचारल्यावर फडणवीस म्हणाले की, राजकारणात शंका-कुशंका होत नाहीत आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतले जात असतात.


'शिवसेनेने विरोधकांशी हातमिळवणी केली'


मतभेद असले तरी भाजप आणि शिवसेना हे शत्रू नाहीत. परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतला जाईल, फडणवीस म्हणाले. आमच्या मित्राने (शिवसेनेने) 2019 च्या विधानसभा निवडणुका आमच्या बरोबर लढवल्या. परंतु निवडणुका झाल्यानंतर त्यांनी (शिवसेना) त्याच लोकांशी (राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस) हातमिळवणी केली ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


केंद्रीय तपास यंत्रणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात विविध प्रकरणांची चौकशी करत आहेत आणि त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी यावेळी दिले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर फडणवीस यांचे हे विधान समोर आले आहे. ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिल्ली दौर्‍यावेळी पंतप्रधानांना स्वतंत्रपणे भेट घेतली होती.


राऊत यांनी आधीच स्पष्टीकरण दिलेय


आदल्या दिवशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी भाजप नेते आशिष शेलार यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल अफवा दूर करण्याचा प्रयत्न केला. "आमच्यात राजकीय आणि वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु जर आपण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये समोरासमोर आलो तर आम्ही त्यांना नक्कीच अभिवादन करू, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले. मी सर्वांसमोर शेलारबरोबर कॉफी देखील पितो, असेही ते म्हणाले.