मुंबई : शिवसेना (ShivSena) भवनासमोर झालेल्या राड्याप्रकरणी शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह 7 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू जगडे, राकेश देशमुख, शशी पुडने यांचा समावेश आहे. भाजप नेत्यांच्या आंदोलनानंतर माहीम पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतील राममंदिर जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून आज दुपारी भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकमेकांना भिडले होते. दरम्यान, यावरून आता नेत्यांमध्येही सामना रंगला आहे. शिवसेनेत हिंमत असेल तर मैदानात यावं असे, आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी दिले आहे. तर अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे.



राम मंदिर उभारण्यासाठीच्या भूसंपादनाबाबत आरोपानंतर भाजपने आंदोलन छेडले. थेट शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजपने शिवसेना भवनासमोर धडक देण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आलेत.  शिवसेना (ShivSena) भवनासमोर आज शिवसेना आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर जोरदार राडा झाला. त्यानंतर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. उगाचच कळ काढली तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. आमच्या अंगावर याल तर शिंगावर घेवू, असा रोखठोक इशारा महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाजपला दिला आहे.


शिवसेना ही चळवळीतून पुढे आली आहे. शिवसेना भवन हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि याला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर मग आमच्याकडून तसेच जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. ही केवळ एक रिअॅक्शन आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याची काय गरज आहे, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.