मुंबई: देशाच्या गृहमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अमित शहा हे काश्मीरमध्ये मोठी शस्त्रक्रिया करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे काश्मीरचा 'भूगोल' बदलला जाईल. परिणामी काश्मीरचा पुढचा मुख्यमंत्री हा हिंदूच असेल, असे शिवसेनेने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने आपल्या 'सामना' मुखपत्रातील अग्रलेखातून अमित शहा लवकरच काश्मीरसंदर्भात मोठे पाऊल उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. अमित शहा यांनी गृहमंत्री झाल्यानंतर काश्मीरमध्ये काय करायचे आहे, हे ठरवले आहे. त्यासाठी अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांची पुनर्रचना केली जाईल. अमित शहांच्या या शस्त्रक्रियेमुळे संपूर्ण काश्मीरचा भूगोलच बदलून जाईल. त्यामुळे काश्मीरचा पुढचा मुख्यमंत्री हिंदू असेल, असा ठाम विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. 


अमित शहा यांनी नुकतीच दिल्लीत काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी आढावा घेणारी बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरचा राजकीय नकाशा बदलण्यासंदर्भात सुतोवाच केल्याची चर्चा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांचे परिसीमन म्हणजे डिलिमिटेशनवर सध्या बंदी आहे. मात्र, ही बंदी शहा यांच्याकडून उठवली जाऊ शकते. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वच मतदारसंघांची नव्याने पुनर्रचना झाल्यास जम्मू भागाला विधानसभेत जास्त प्रतिनिधीत्व मिळू शकते. खोऱ्याच्या तुलनेत जम्मूमध्ये हिंदुंची संख्या जास्त असल्याने काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री सुद्धा बनू शकतो, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे.


शिवसेनेकडून अमित शहा यांच्या या संभाव्य निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. जम्मू–कश्मीर विधानसभेचे परिसीमन केले तर स्थानिक लोकांत असंतोष पसरून भडका उडेल अशी भीती सातत्याने दाखवली गेली. पूर्वीच्या काँग्रेस सरकारातील केंद्रीय गृहमंत्र्यांनी नांगी टाकली. आता देशाचेच चित्र बदलले आहे व अमित शहा यांनी कश्मीर प्रश्नाला प्राधान्य दिले आहे. सरकार फालतू आणि वायफळ चर्चांत वेळ दवडणार नाही. सरकार निर्णय घेईल व त्याची कठोरपणे अंमलबजावणी करतील, अशी आशाही शिवसेनेने अग्रलेखातून व्यक्त केली आहे.