अंतिम फॉर्म्युला अखरे ठरला, महायुतीची घोषणा आज रात्री १२ पर्यंत होणार !
भाजप - शिवसेना युतीचा अंतिम फॉर्म्युला अखेर ठरला आहे.
मुंबई : भाजप - शिवसेना युतीचा अंतिम फॉर्म्युला अखेर ठरला आहे. जागांबाबत अंतिम सहमती झाली आहे. पत्रकाराच्या माध्यमातून युतीची घोषणा होईल, अशी माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महायुतीची घोषणा आज रात्री १२ वाजेपर्यंत होण्याचे संकेत भाजपकडून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयुक्तपणे युतीची घोषणा करतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे युती होणार हे स्पष्ट झाले आहे.
युतीचे ठरले असले तरीही अद्याप युतीची जाहीर घोषणा झालेली नाही. त्यामुळे आजही मातोश्रीवर उमेदवारांचा राबता दिसून येत होता. शिवसेना पक्षाकडून आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे युती होणार की नाही याचीच उत्सुकता शिगेला होती. मात्र, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीचे संकेत दिले आहेत. याची घोषणा लवकरच होईल, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीबाबत संयुक्तपणे सांगतील. मला काहीही अधिकार नाहीत. त्यामुळे युतीबाबत काहीही सांगू शकत नाही, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले.
शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांनी एक पाऊल पुढे जात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याची डरकाळी फोडली. युती जाहीर होण्यापूर्वी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या मुद्याला शिवसेनेने हात घातला. चांद्रयान मोहीम अपयशी ठरली असती तरी शिवसेनेचे सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर यशस्वीपणे उतरणार असल्याचे संजय राऊतांनी ठासून सांगितले. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करणे यात गैर नाही. मी याआधीही स्पष्ट केले आहे. प्रत्येकाची इच्छा असते. तो त्यांच्या पक्षाचा आणि नेत्यांचा अधिकार आहे. कोणाला महत्वाकांक्षा असणे गैर नाही, असे ते म्हणालेत.
दरम्यान, राज्यात मुख्यमंत्र्यांनंतरचे दोन नंबरचे वजनदार नेते आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढणार आहेत. कोथरुड भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहेत. चंद्रकांत पाटलांसाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णींना पक्षासाठी त्याग करावा लागणार आहे. मेधा कुलकर्णी कोथरुडमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. मात्र अधिकृत घोषणा झाल्याशिवाय बोलणार नसल्याचं आमदार मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.